सद्यस्थितीत थंडी नसल्याने मोहोर फुटीसाठी पोषक वातावरण नाही. हंगामाच्या प्रारंभीच अशा प्रकारच्या वातावरण व स्थितीमुळे आंबा, काजू हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता असून यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
गेल्यावर्षी आंबा बागायतदारांचा हंगाम खराब गेला. यंदाही तिच स्थिती पाहायला मिळाली. मात्र, अशा स्थितीत नवीन वर्षात तरी किमान आंबा, काजूचे चांगले उत्पादन येण्याच्या अपेक्षेने आंबा, काजू उत्पादक शेतकरी तयारीला लागले आहेत. आता काही ठिकाणी फवारणीची कामेही सुरू आहे. ही फवारणी पालवी टिकवण्यासाठी असून यावरच आंबा, काजू हंगामाची यशस्वीता अवलंबून आहे.
निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती उद्भवली आहे. या ढगाळ वातावरणामुळे नवीन पालवीवर कीड रोगांचे संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. पहिली पालवी टिकवण्यासाठी आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यामध्ये कोणतेही शंका नाही. पालवी जर कीड रोगांच्या विळख्यात सापडली तर हंगाम लांबणीवर पडणार असं आंबा, काजू, बागायदारांचं म्हणणं आहे. नव्याने येणाऱ्या पालवीची प्रतीक्षा करेपर्यंत मोहराचा कालावधी उलटून जाणार आहे. त्यामुळे आंबा, काजू उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कलमांची पालवी टिकवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर फवारणी करत आहेत. आंबा, काजू मोहरासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही.
यंदा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला नसल्याने मोहोर फुटीसाठी पोषक वातावरण नाही असे मुळदे कृषी संशोधन केंद्राने सागितले आहे. गेली काही वर्षे नोव्हेंबर हिट व थंडीचा कडाका अशा वातावरणाचे चित्र फारच कमी प्रमाणात दिसले. नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे याही वर्षी आंबा, काजू हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.