• Sat. Sep 21st, 2024
इन्स्टाग्रामवर मित्राचा VIDEO कॉल उचलला, काही वेळातच असं घडलं की तरुणी थेट पोलिसांत…

रत्नागिरी : सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ओळखीच्या नावाचे बनावट अकाउंट बनवून तरुणीची फसवणूक करत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या ३२ वर्षे युवकाला पुणे येथून दापोली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. रमेश भागोजी कोरके, वय ३२ वर्ष रा. कोरकेवाडी कोलतावडे, ता. आंबेगाव जिल्हा पुणे, याला दापोली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली आहे.

सोशल मीडियावरील वावर असणाऱ्या तरुणांमध्ये Instagram हे जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी, दापोली पोलीस ठाणे इथे राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने संबंधित व्यक्ति ही आपलीच मैत्रीण असल्याने त्यांनी लगेच ती स्वीकारली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं.

याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिला थोड्या वेळाने एक व्हिडिओ कॉल आला व या कॉलमध्ये एक अज्ञात इसम आपला चेहरा न दाखवता, अर्धनग्न शरीर दाखवत अश्लील चाळे करून दाखवत असल्याचे दिसले. थोड्याच वेळात याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या तरुणीचे तसेच या अज्ञात व्यक्तीचे बनावट फोटो (Morphed Photo) तिला व तिच्या इतर Instagram वरील मित्र मैत्रिणींना पाठविण्यात आले.

सर्व बनावट फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याबाबत धमकावण्यात आलं. या तरुणीने घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या मैत्रिणीच्या मोबाइल नंबरवर कॉल केला असता तिला लक्षात आले की, आपली मोठी फसवणूक झाली आहे व सदरचे इन्स्टाग्राम अकाऊंट हे बनावट अकाऊंट आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दापोली पोलीस ठाणे इथे या तरुणीने या अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीची लागलीच दखल घेत दापोली पोलीस ठाणे इथे गुन्हा रजिस्टर नंबर 170/2023 भा.द.वि.संहिता कलम 354(अ)(1)(3), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 सुधारित 2015 चे कलम 66(C), 67(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व याचा तपास दापोली पोलीस ठाणे पथकामार्फत व सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपास सुरू करण्यात आला.

सदरचा गुन्हा हा सायबर पोलीस ठाणे यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आलेला आहे. तसेच या गुन्ह्यामधील आरोपी रमेश भागोजी कोरके, वय ३२ वर्ष रा. कोरकेवाडी कोलतावडे, ता. आंबेगाव जिल्हा पुणे, याला दापोली पोलीसांमार्फत आज रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे व या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed