• Mon. Nov 25th, 2024
    अमोल कोल्हे अजित पवार यांच्या भेटीला, भूमिका बदलून दादांच्या सोबतीला जाणार?

    मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचं? यावरून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक निवडणूक आयोगात संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, या मागणीसाठी अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. आश्चर्य म्हणजे या याचिकेतून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि स्वत: शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलंय. या घडामोडीनंतर खासदार अमोल कोल्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या कार्यालयात उभय नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या सगळ्यानंतर अमोल कोल्हे आपली भूमिका बदलून अजित पवार यांना पाठिंबा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं याचिकेतून वगळण्यात आली आहेत. त्याचवेळी वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल यांच्यावर मात्र कारवाईची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. मग कोल्हे आणि पवार बापलेकीचं नाव याचिकेतून का वगळलं? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का? असे प्रश्न उपस्थित होतायेत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडतायेत.

    अमोल कोल्हे यांनी जरी शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दिलेला असला तरी शरद पवार गटाच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना, सभा-संमेलनांना ते उपस्थिती लावत नाहीत. शक्य तेवढं अंतर राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या भूमिकांवर अमोल कोल्हे टीका करत नाही. याउलट अजित पवार यांच्या शपथविधीवेळी स्वत: कोल्हे राजभवनात उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्रित यावं, अशी भूमिका त्यांनी बऱ्याचवेळा व्यक्त केली. एकंदर अजित पवार यांच्या गटाकडे त्यांचा ओढा आहे. त्याचमुळे आजच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

    दुसरीकडे अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, निवडणूक आयोगात पवार काका-पुतण्यांचा संघर्ष सुरू असताना ही लढाई आता निर्णायक टप्प्यांवर येऊन पोहोचली आहे. शरद पवार गटाच्या युक्तिवादानंतर आता अजित पवार यांचा गट युक्तिवाद करणार आहे. त्यावेळी अमोल कोल्हे यांचा पाठिंबा नक्की कुणाला आहे? याचा उल्लेख युक्तिवादादरम्यान होऊ शकतो. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी आजची भेट नाही ना? अशी शंका राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed