• Mon. Nov 25th, 2024

    आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार

    आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या शहराला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसते, हे वास्तव आहे. हे कमी होते की काय, आता महापालिकेने ठेवलेल्या कचराकुंड्याच गायब करण्याचे वा त्यांची तोडफोड करण्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत.

    सध्या शहराच्या कुठल्याही भागात जा, जागोजागी कचरा पडलेला दिसतोच. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्वच्छतेत शहर माघारले, त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कुठली पावले उचललेली नाहीत, हेच यावरून दिसून येते. कुणीही यावे अन् कुठेही कचरा टाकून जावे, अशीच सध्याची स्थिती आहे. रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला असतो. कचराकुंड्याही तुडुंब असतात, अशी स्थिती आहे. आता तर नाल्यांच्या बाजूला नागरिक तसेच प्रतिष्ठाने कचरा आणून टाकत आहेत. शहराच्या सौंदर्याला ही बाब मारक ठरत असल्याचे सूज्ञांचे मत आहे.

    शहर स्वच्छ राहावे, नागरिकांत जागरुकता यावी, यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या कचराकुंड्या ठेवल्या. स्टीलच्या या कचराकुंड्या महाग आहेत. काटोल रोड परिसर, सेमिनरी हिल्स यासह शहराच्या अनेक भागांतील या कचराकुंड्याच कित्येकांनी पळविल्या. तर काही ठिकाणी त्या उखडून फेकल्याचे चित्र आहे. अशाने स्वच्छ नागपूरचे स्वप्न पूर्ण होणार कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
    छत्रपती संभाजीनगरात लाख घरांवर टांगती तलवार; गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामांना नोटीस
    ‘कठोर दंड करा’

    महापालिका प्रशासन यासाठी जेवढे जबाबदार आहे, तेवढेच काही नागपूरकरही आहेत. आपले शहर स्वच्छ असावे, असे प्रत्येकाला वाटायला हवे. सौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, मोठा दंड आकारायला हवा, असे मत व्यक्त होत आहे. महापालिकेने त्यासाठी हिंत दाखवावी, असेही अनेकांचे मत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *