या मार्गाचे लोकार्पण आणि पुलासाठी सरकत्या जिन्यांचे भूमिपूजन मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण कार्यक्रमाला स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीवरून चर्चा रंगली असतानाच कार्यक्रमाला स्थानिक नेत्यांनाही आमंत्रण असल्याचे सांगून केसरकर यांनी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे थेट नाव घेणे टाळले. विविध मुद्यांवर केसरकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे गटाच्या उड्डाणपूल उद्घाटनाच्या भूमिकेवर त्यांनी टीकाही केली.
जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना. म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. नव्याने बांधलेल्या पुलावर चार नवीन जिने बांधण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तसेच या पुलाला दोन सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवामार्गांची रूंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांची वहिवाट पूर्वीपेक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या पुलाच्या एका मार्गिकेचे काम १८ सप्टेंबर, २०२३ रोजी पूर्ण झाले व ती मार्गिका दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. आता दुसरी मार्गिकाही पूर्ण झाल्याने आज, गुरुवारपासून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे.
आदित्य ठाकरे यांना आमंत्रण
डिलाइल पुलाच्या शेवटच्या मार्गिकेचे किरकोळ काम सुरू असतानाच त्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी नुकतेच केले होते. यामुळे बराच वादही रंगला. याविरोधात पोलिस ठाण्यातही तक्रार झाली. या पार्श्वभूमीवर पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला आमदार आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आले असून स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार आशीष शेलार यांच्यासह आमदार सुनील शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.