• Mon. Nov 25th, 2024

    तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम

    तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आहे. या वनस्पतींपैकी एक म्हणजे मोह किंवा महुआ. पशुखाद्य म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या मोहापासून बनविण्यात येत असलेल्या अवैध मद्यामुळे अनेकांच्या आयुष्यात विष पेरले जात आहे. जीव धोक्यात टाकून मोहाचे मद्य पिणाऱ्या तरुणाईला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावधतेचा इशारा दिला आहे. या हातभट्टीच्या दारूवर कारवाई करण्यासाठी कारवाईची मोहीम आखण्यात आली आहे.

    मोहफुलापासून पशुखाद्य तयार करण्यासाठी शासनाकडून परवाने दिले जातात. मोहफुल प्राप्त करणे आणि त्याचा वापर करण्यासाठी एमएफ-१ आणि विक्रीसाठी एमएफ-२ असे परवाने दिले जातात. मोहफुल पशुखाद्य म्हणून विक्री करण्यालाही मर्यादा आखून दिल्या आहेत. एका व्यक्तीला केवळ पाच किलोंची विक्री करण्याचे बंधन आहे. मात्र, छुप्या पद्धतीने या मोहफुलापासून दारू बनविणारे रॅकेट सक्रिय आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कुठलीही परवानगी न घेता विक्री होणाऱ्या मद्यसाठ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी सांगितले. आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूचे आठ अड्डे बंद केले.

    अवैध दारूचे ४२ अड्डे

    मोहफुल आयुर्वेदिक असल्याने त्यापासून तयार केलेले मद्य आरोग्यास लाभदायी असते, असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरविला जात आहे. मात्र, मोहफुल आणि गुळाचा वापर करून तयार होणारे मद्य घातकच मानले जाते. या मद्यावर लक्ष ठेवणारी कुठलीही यंत्रणा नाही. स्वच्छतेकडेही फारसे लक्ष दिले जात नाही. परवानाधारकांकडून मद्य बनविताना रासायनिक विश्लेषण अहवाल तयार केला जातो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारखान्यात उपस्थित राहून यावर लक्ष ठेवतात. मात्र, मोहाची दारू बनविताना कुठलेही निकष पाळले जात नाहीत. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी, चांपा, राजुरवाडी, दहेगाव, डोंगरगाव आदी भागांत गावठी दारूचे ४२ अड्डे आहेत. गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातही असे अवैध प्रकार चालतात.

    युरिया आणि नवसागरचा वापर

    मोहापासून दारू बनविताना ते सडविले जाते. ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी युरियाचा वापर केला जातो. नशा यावी, यासाठी नवसागर आणि तुरटीचाही वापर केला जातो. कमी खर्चात अवैध पद्धतीने मद्य तयार करून नफा कमविणाऱ्या रॅकेटला आळा घालण्याची गरज आहे. हातभट्टीची दारू पिऊन विषबाधा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *