रेल्वे प्रशासनाने ‘मिशन जीवनरक्षा’ अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ५० हजारांहून अधिक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. याचबरोबर, उपनगरी मार्गांवरील विविध स्थानकांत जनजागृती कार्यक्रम तसेच यमराज अभियानही राबवण्यात आले आहे. दंडात्मक कारवाई, रूळ ओलांडण्यास मज्जाव, उद्घोषणांद्वारे जनजागृती अशा उपाययोजना केल्या, तरीही रेल्वे रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांत फलाटाच्या दोन्ही बाजूंचे उतार, म्हणजेच रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडण्याची सवय मोडेल आणि ते पादचारी पुलाचा वापर करतील, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
रेल्वेचे आवाहन
प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य व हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकांत पादचारी पूल, सरकते जिने (एस्कलेटर), लिफ्ट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी बहुतेक स्थानकांत काम पूर्ण झाले आहे, काही स्थानकांतील कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रूळ न ओलांडता पूल, सरकते जिने, लिफ्ट यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वेमार्गांवरील सर्व स्थानकांतील रॅम्प तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्यात येतील. वर्षअखेरपर्यंत बहुतांश स्थानकांतील रॅम्प तोडून, त्या जागी रेलिंग बसवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर करावा. आपले प्राण धोक्यात घालू नयेत.
– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे