‘एनडीए’च्या १४५व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी पार पडेल. या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती मुर्मू स्वीकारणार असल्याचे संरक्षण मंत्रालयातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. एनडीएच्या प्रथेनुसार संचलनासाठीचे प्रमुख पाहुणे आदल्या दिवशी सायंकाळी होणाऱ्या टॅटू शो लाही उपस्थित असतात. त्यामुळे राष्ट्रपतींचा अधिकृत दौरा जाहीर झालेला नसला तरी त्या २९ नोव्हेंबर रोजीच एनडीएमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
वानवडी येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अर्थात एएफएमसी हे वैद्यकीय प्रशिक्षण देणारे संरक्षण दलाचे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाही ७५ वर्षापासून कार्यरत असून त्यातून घडलेल्या हजारो वैद्यकीय तज्ज्ञांनी सशस्त्र दलांमध्ये वैद्यकीय सेवा बजावली आहे.त्यामुळे एएफएमसीच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी एएफएमसीला एक डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट्स कलर’ने गौरविण्यात येणार आहे. प्रेसिडेंट्स कलर हा कोणत्याही लष्करी संस्था अथवा तुकडीला (युनिट) मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे.
या वेळी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ खास संचलनही होणार असून त्याचे नेतृत्व महिला वैद्यकीय अधिकारी करणार आहे. या वेळी पोस्टातर्फे एएफएमसीवर काढण्यात येणाऱ्या खास कव्हर व टपाल तिकिटाचे प्रकाशनही या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. तसेच कॉम्प्युटेशनल मेडिसिनसंदर्भातील नव्या केंद्राचे उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होईल.
Read Latest Maharashtra News And Marathi News