नंदुरबार, दिनांक १९ – महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहेच, परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास, आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटन यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते आज तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रतिलाल नाईक, तोरणमाळचे सरपंच इंदुबाई चौधरी, नगरसेवक संतोष वसईकर, पर्यटन संचालनालयाच्य उपसंचालिका मधुमती सरदेसाई, कृषी पर्यटन तज्ञ पांडुरंग तावरे, नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे, ‘माविम’ च्या वरिष्ठ अधिकारी कांता बनकर, धडगावचे सुभाष पावरा, पर्यटन संचालनालयाचे कल्पेश पाडवी तसेच तोरणमाळ भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तोरणमाळ या पर्यटन तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून पूर्वीपासूनच शासनाचे प्रयत्न राहिले आहेत आणि आता विद्यमान स्थितीतदेखील या दुर्गम भागातील बचत गटांना त्याच दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणे सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रस्ते जोड योजना राबवणार आहे. तोरणमाळपासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहोचावी म्हणून ३३ केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी २०० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होतील आणि त्यातून विविध कामे सुरू झालेली दिसतील; अशी माहिती देऊन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी तोरणमाळच्या पर्यटन विकासाला भरभक्कम चालना देणार असल्याची ग्वाही दिली.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ सर्वत्र ओळखले जाते. आता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा रस्ते जोड योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे तोरणमाळ परिसरातील सर्व दुर्गम पाडे पर्यटनाच्या दृष्टीने संपर्कात येतील. या भागातील उंच शिखर जोडणारे झुलते पूल करावे, डंकी जम्पिंग ची व्यवस्था करावी, तोरणमाळ भागात बोटिंग व्यवसाय विकसित करावा अशा विविध कामांना चालना दिली तर पर्यटन वाढू शकते. त्यादृष्टीने आपला सतत प्रयत्न राहणार आहे. विद्यमान स्थितीत या भागातील लोकांच्या घरात वीज पोहोचावी म्हणून ३३ केवीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून येथील बचत गटांना केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून चालना देऊन प्रक्रिया उद्योग विकसित केले जातील, असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून विषद केली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कृषीतज्ञ पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाची सविस्तर माहिती दिली.
विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करणारे पथक, त्या भागात पर्यटनाला आलेले एक दांपत्य, स्ट्रॉबेरी सारखे निराळे कृषी प्रयोग राबवणारे शेतकरी आणि अन्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी प्रदर्शित प्रत्येकदालनाला भेट देऊन स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी संवाद साधत विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्प कसा विकसित करता येईल याचे मार्गदर्शन केले.