काय आहे प्रकरण?
या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष पंकज शिवाजीराव चंदशिव यांच्यासह सचिव, संचालक आणि सोसायटीचा व्यवस्थापक यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुधाकर कारभारी गायके (वय ५०,रा. दिवाण देवडी) हे विशेष लेखापरीक्षक वर्ग २ या पदावर कार्यरत आहेत. सुधाकर कारभारी गायके यांनी तक्रारीनुसार, ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी लि. दत्तराज टॉवर, प्लॉट नंबर ६२, कामगार चौक रोड, मायानगर या संस्थेची १९ जानेवारी २०२३ या संस्थेचे अभिलेखे ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नऊ ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आली आहे. हा तपासणी अहवाल २७ ऑक्टोबर रोजी निबंधक कार्यालयास सादर करण्यात आला आहे.
या तपासणीत संस्थेचे अध्यक्ष पंकज शिवाजीराव चंदनशिव यांनी मोठ्या प्रमाणात सभासदांकडून ठेवीच्या रोख रक्कम स्वीकारल्या. मात्र, या रकमा सोसायटीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या ताब्यात ठेवून अपहार केल्याचे समोर आले आहे. याशिवाय संस्थेच्या सचिवांसह अन्य सदस्य व व्यवस्थापकांनी रकमेचा अपहार करण्यास व गैरव्यवहारासाठी अध्यक्ष चंदनशिव यांच्यासोबत संगनमत करून २९ कोटी ५ लाख ९२ हजार २०५ रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी सुधाकर गायके यांच्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष पंकज शिवाजीराव चंदनशिव, सचिव अॅड. धनंजय ज्ञानोबा सावंत, संचालक शिवाजीराव जिजाभाऊ चंदनशिव,इंदुमती शिवाजीराव चंदनशिव; तसेच व्यवस्थापक राहुल रामचंद्र दहिहंडे या पाच जणांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
उचल, कर्जवाटपांच्या नावाखाली केला घोटाळा
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान २१ कोटी ८३ लाख, ६६ हजार ९९५ रुपयांचा अपहार करण्यात आला. यापूर्वी २४ नोव्हेंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या दरम्यान जिल्हा बँकेतून उचल करण्याच्या नावाखाली २४ लाख ९० हजार रुपये काढून घेतले. याशिवाय एक जून २०२३ ते ३० सप्टेंबर रोजी आरबीएल बँकेतून ५३ लाख ३९ हजार ३३३ रुपये, २० मे २०२३ रोजी सिंपल कर्ज वितरित करण्याच्या नावाने चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आले; तसेच १० मे २०२३ ते २२ जून २०२३ या दरम्यान मुदतठेव तारण कर्ज दर्शवून सहा कोटी ३९ लाख ९२ हजार ८७७ रुपये काढून एकूण २९ कोटी पाच लाख ८९ हजार २०५ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
बनावट रेकॉर्ड केले तयार
रक्कम दुप्पट किंवा चांगला परतावा देऊन ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीने अनेकांच्या ठेवी जमा केलेल्या आहेत. या ठेवी विविध कारणे दाखवून काढण्यात आले. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज चंदनशिव, अॅड. धनंजय ज्ञानोबा सावंत आणि व्यवस्थापक राहुल रामचंद्र दहिहंडे यांनी बनावट रेकॉर्ड तयार केल्याची माहिती तपासणी अहवालात समोर आली आहे.