• Mon. Nov 25th, 2024
    चांद्रयान ४ असेल ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम, चंद्राच्या या भागाचा घेणार वेध; वाचा सविस्तर..

    पुणे : चांद्रयान ३ च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुढील चांद्रमोहिमांची आखणी सुरू केली आहे. चंद्रावरून दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी (सॅम्पल रिटर्न) चांद्रयान ४ आणि सदा सर्वकाळ अंधारात असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा वेध घेण्यासाठी जपानसोबत लुपेक्स मोहीम २०३० पर्यंत राबवण्यात येणार आहे.

    इस्रोच्या स्पेस अप्लिकेशन सेंटरचे (सॅक) संचालक डॉ. निलेश देसाई यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला याबाबत माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीच्या (आयआयटीएम) ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. देसाई पुण्यात आले होते. या वेळी इस्रोच्या आगामी मोहिमांविषयी त्यांनी माहिती दिली.

    डॉ. देसाई म्हणाले, ‘चांद्रयान ३ मधील हॉप प्रयोगाच्या (विक्रम लँडरने चंद्रावर उडी मारण्याचा प्रयोग) यशानंतर पुढील मोहिमेत चंद्रावरून दगड मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याचे निश्चित झाले. त्याच सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४० पर्यंत चंद्रावर भारताची मानवी मोहीम आखण्याचे लक्ष्य इस्रोसमोर ठेवले. ते लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने ‘चांद्रयान ४’ मोहिमेची आखणी करण्यात येत आहे. ‘चांद्रयान ४’ ही अधिक क्लिष्ट आणि आव्हानात्मक मोहीम असेल.’

    ‘प्राथमिक आराखड्यानुसार भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही मार्क २) आणि लाँच वेहीकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या दोन रॉकेटच्या साह्याने चांद्रयान ४ चे एकूण चार भाग प्रक्षेपित करण्यात येतील. या भागांमध्ये ट्रान्स्फर मॉड्यूल (टीएम), डिसेंडर मॉड्यूल (डीएम), असेंडर मॉड्यूल (एएम) आणि रिएंट्री मॉड्यूलचा (आरएम) समावेश असेल. जीएसएलव्ही मार्क २ च्या साह्याने आरएम आणि टीएमचे, तर एलव्हीएम ३ च्या साह्याने एएम आणि डीएमचे प्रक्षेपण करण्यात येईल. एएम आणि डीएम चंद्रावर उतरतील,’ असेही डॉ. देसाई म्हणाले.

    चंद्रावरून रोबोटीक हाताच्या साह्याने एएम दगड मातीचे नमुने जमा करून पुन्हा अवकाशात झेप घेईल. त्यानंतर चंद्राभोवतीच्या कक्षेत असलेल्या टीएम आणि आरएमच्या जोडीकडे हे नमुने स्थानांतरित केले जातील. टीएम आणि आरएमची जोडी पृथ्वीच्या कक्षेत परत येईल. त्यापैकी आरएम चंद्रावरील नमुने घेऊन जमिनीवर उतरेल, अशी इस्रोची योजना आहे. २०२८ पर्यंत ही मोहीम राबवण्याचा इस्रोचा प्रयत्न असून, सध्या हा आराखडा मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.

    जपानसोबत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम

    जपानसोबतच्या लुनार पोलार एक्सप्लोरेशन (लुपेक्स) या मोहिमेचा आराखडा तयार झाला असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘चंद्राच्या सदा सर्वकाळ अंधारात असलेल्या दक्षिण ध्रुवावर लुपेक्स मोहीम पाठवण्यात येईल. या मोहिमेतील लँडर मॉड्यूल भारताचे असेल, तर रोव्हर आणि रॉकेट जपानचे असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एक बाय एक किलोमीटर क्षेत्राचा १०० दिवस अभ्यास या मोहिमेतून करण्यात येईल. त्या मध्ये ध्रुवावरील पाणी; तसेच जमिनीचा अभ्यास करण्यात येईल. २०३० पर्यंत ही मोहीम राबवण्याचे नियोजन आहे.’

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *