खटाव तालुक्यातील मायणीजवळ गुंडेवाडी हे गाव आहे. या गावात सर्वच समाज हा सकल मराठा आहे. नव्या नामकरणामुळे आता गुंडेवाडी नव्हे तर मराठानगर म्हणून या गावाची जगाला ओळख होणार आहे.
गुरुवारी रात्री मायणी येथील सभा संपल्यावर मनोज जरांगे पाटील हे साडेअकराच्या सुमारास गुंडेवाडी गावात दाखल झाले. त्यांच्या शुभहस्ते या गावाचे मराठानगर असे नामकरण करण्यात आले. यावेळी जरांगे यांचे गावात ढोल, ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत ज्योतिबाचे दर्शन घेतले यानंतर त्यांची सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन केल्यानंतर जरांगे यांचा मराठानगर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर सर्वांचे उत्सुकता लागून राहिलेल्या गुंडवाडीचे मराठानगर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. विशेषत: या गावांमध्ये फक्त सकल मराठा बांधवच आहेत.
गुंडेवाडीचे मराठानगर नामकरण करताना ग्रामस्थांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गेली ४ वर्ष नामकरण व्हावे यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागली. मराठा क्रांतीचे वादळ २०१६-१७ ला निर्माण झाले. तेव्हाच गुंडेवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आले, की आपण आपल्या गावाचे नाव गुंडेवाडी ऐवजी मराठानगर ठेवावे. यासाठी त्यांनी प्रथम ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे ठराव घेऊन तो ठराव जिल्हाधिकारी सातारा विभागीय आयुक्त पुणे व मंत्रालयात देण्यात आले. मंत्रालयातून ते ठराव केंद्र सरकारला देण्यात आला. त्यानंतर या ठरावावर चार वर्षानंतर शिक्कामोर्तब झाले.
येरळा नदीकाठी वसलेल्या या सदन गावची लोकसंख्या चौदाशे आहे. या गावांमध्ये सर्व मराठा समाजाचे लोक आहेत. गावाला ग्रामपंचायत असून त्यात सात सदस्य आहेत. विद्यमान सरपंच दिपाली शरद निकम आहेत. गुंडेवाडी नाव असूनही गावकऱ्यांच्या एकतेमुळे गावाने आदर्श गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. तसेच स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. गावात एक गाव, एक गणपती, एक दुर्गोत्सव, एक यात्रा असा गावाचा लौकिक आहे.
मराठानगर हे राज्यातील पहिले नाव: मनोज जरांगे
राज्यातील हे पहिलं नाव असेल मराठानगर! तुमच्यासारखं आणि तुमच्या नावासारखं आणि गावासारखं बरोबर नाव तुम्ही शोधून आणल. तुम्हाला मार्क द्यावे तेवढे कमीच आहेत. तुमच्यासाठी बोलायला शब्दही अपुरे आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News