मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी ठाकरे गटाकडून गद्दार..गद्दार अशी घोषणबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले होते. शिंदे गटाचा कार्यक्रम झाल्याने त्यांनी शिवतीर्थावरुन बाहेर निघून जावे अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब आणि अनिल देसाई यांनी केली. मात्र, शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथेच थांबल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाकडूनच घोषणाबाजीला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले
हा अतिशय दुर्देवी आणि निंदनीय घटना आहे. उद्या स्मृतीस्थळादिनीनिमित्त काही वाद नकोत म्हणून आम्ही आजच स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांचे दर्शन घेतले. परंतु उ.बा.ठा गटाकडून तेथे येत राडा करण्यात आला हे चुकीचं आहे अशोभनीय आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मी सर्वांना शांततेच आवाहन करतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
ही दुर्देवी घटना आहे. जे गद्दार आहेत, घाबरलेले आहेत, जे गुवाहटीला आणि गुजरातला पळून गेले यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.