आगामी पदवीधर निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी मनसेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठका घेतल्या. त्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पदवीधरांनी येऊन ज्या उमेदवाराला मतदान करावे, तो उमेदवार पदवीधर असावा अशी कुठलीही अट नाही मग ही कुठली पदवीधर निवडणूक असे ठाकरे यावेळी म्हणाले.
सिनेट निवडणुकांचे आम्ही फॉर्म भरतोय, पदवीधर मतदार संघाची पुढच्या वर्षी निवडणुका आहेत त्यासंदर्भात बैठक होती, असेही ठाकरे म्हणाले. मराठी पाट्यांबद्दल न्यायालयाने आदेश दिले पण अजुन देखील पालन होताना दिसत नाही, सरकारसुद्धा याप्रश्नी काही करत नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. तर सण कसे करायचे, फटाके केव्हा फोडायचे हे कोर्ट ठरवतंय, पण त्याचे पालन होतं की नाही यावर लक्ष कोणाचं नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात जात अनेकांना प्रिय आहे, प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान आहे,
मात्र आमच्या पक्षात जातीवादाला थारा नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा पासुन जाती जातींमध्ये धोका
१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हापासुन जाती जातींमध्ये धोका निर्माण झाला. स्वतः च्या स्वार्थासाठी हे सर्व घडवलं जाते असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेत सत्तेचा अमर पट्टा कोणी घेऊन येत नाही, वाजपेयींचा काळ वेगळा होता. तेव्हाची पद्धतही वेगळी होती, ईडीच्या धाडी वगैरे फार काळ चालणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
२५ डिसेंबरला जरांगे – पाटील सांताक्लॉज बनून येणार का?
मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांना आधीच सांगितले आहे. या आंदोलनामागे जरांगे – पाटीलच आहेत की त्यांच्या मागे आणखीन कोण आहे ते येणाऱ्या काळात कळेल. येत्या २४ डिसेंबरपर्यंतचा जरांगे – पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता २५ डिसेंबरला जरांगे – पाटील काय सांताक्लॉ बनून येणार आहेत का? अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी याप्रसंगी केली.