जुली (बदललेले नाव) ही व्यावसायिक अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. ती वसतिगृहात राहते. जॉनी (बदललेले नाव) हा विवाहित असून, आर्थिक गुंतवणूक सल्लागार आहे. दीड वर्षापूर्वी दोघांची एका पबमध्ये भेट झाली. त्यानंतर चार वेळा दोघेही एकाच वेळी एकाच पबमध्ये एकमेकांसमोर आल्याने वय व इतर बंधनांच्या सीमा सैल झाल्या. दोघे लपून छपून भेटायला लागले. प्रेमाचा बहार चांगलाच फुलला.
जॉनीने कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत घरी जाणेही कमी केले. जॉनीची ४० वर्षीय पत्नी, २० वर्षीय मुलगा व ११ वर्षीय मुलगी काळजीत पडले. जॉनीला काय झाले हे सुरुवातीला त्यांना कळलेच नाही. जॉनीच्या पत्नीचा संशय बळावला. तिने मुलीची मदत घेतली. एके दिवशी जॉनी घरी आला. त्याच्या नकळत नातेवाइकांनी जॉनीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅपची पाहणी केली असता त्यात जुलीसोबतची चॅटिंग आढळली.
जॉनीच्या पत्नीला जबर धक्का बसला. तिने जॉनीची समजूत घातली. मात्र, तो ऐकून घेण्याच्या स्थितीतच नव्हता. पत्नी हताश झाली. काय करावे तिला कळेना. अखेर हिंमत करून ती मुलांसह पोलिस आयुक्तालयात दाखल झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे आपबिती सांगितली. अमितेशकुमार यांनी भरोसा सेलला या प्रकरणात जातीने लक्ष घालून समेट घडविण्याचे निर्देश दिले. पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी जॉनी व त्याच्या पत्नीला समुपदेशनासाठी कार्यालयात बोलाविले. समुपदेशन करून पती-पत्नीमध्ये समेट घडविला.
मी घरी जाणार नाही!
भरोसा सेलमध्ये पोलिसांनी जॉनी व त्याच्या पत्नीला समुपदेशनासाठी बोलाविले. त्यावेळी जॉनीने ‘मी घरी जाणार नाही. काय होवो ते होवो’, असा पवित्रा घेतला. पोलिसांनी त्याची समजूत घातली. तरी तो ऐकायला तयार नव्हता. त्याला दुसऱ्या दिवशी बोलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी तो समुपदेशनासाठी आला. पोलिसांनी पुन्हा त्याची समजूत घातली. ‘मी कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतो. मात्र, घरी जाणार नाही’, असे त्याने सांगितले. सेलने तिसऱ्या व चौथ्या समुपदेशनादरम्यान जुलीलाही बोलाविले. पोलिसांनी जॉनी व जुलीची समजूत घातली. अखेर दोघांनी दूर होण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघेही विभक्त असून, पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
१९०१ खटल्यांचा निपटारा
भरोसा सेलमध्ये यावर्षी ५ नोव्हेंबरपर्यंत एकूण २ हजार १७८ प्रकरणे आली. त्यापैकी सर्वाधिक १,९०१ प्रकरणांचा पोलिसांनी निपटारा केला. २७५ प्रकरणांचा अद्याप निपटारा झालेला नाही. पोलिसांकडून १,५९१ प्रकरणे तर ५८५ जण स्वत: भरोसा सेलकडे आले. पोलिसांनी तीन पीडितांच्या निवाऱ्याचीही व्यवस्था केली.
Read Latest Nagpur Updates And Marathi News