• Sat. Sep 21st, 2024

पाच अज्ञात बहिणींचे भावांना नवे जीवन, अवयवदानाच्या टक्केवारीत ३०० टक्क्यांनी वाढ

पाच अज्ञात बहिणींचे भावांना नवे जीवन, अवयवदानाच्या टक्केवारीत ३०० टक्क्यांनी वाढ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: आयुष्यातील अखेरच्या प्रवासाला जाताना गेल्या वर्षभरात पाच बहिणींनी आपल्या कितीतरी भावांना म्हणजे पुरुषांना अवयवदान करत त्यांना नवे आयुष्य दिले आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघता विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र नागपूरच्या (झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर- झेडटीसीसी) अंतर्गत अवयवदानाची टक्केवारी मागीलवर्षीच्या याच काळातील तुलनेत तीनशे टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारीपासून नागपूर केंद्रांतर्गत २३ पुरुष आणि ५ महिलांनी अवयवदान केले आहे.

एखादा व्यक्ती किंवा त्याचा जवळचा नातेवाईक (मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचा) अवयवदान करून गरजू व्यक्तीला, जगण्यासाठी अवयवांची गरज असलेल्यास मदत करतात, त्याला अवयवदान म्हणतात. १८ वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत: निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात. गेल्या नऊ महिन्यांत नागपूर विभागात ज्या पाच महिलांनी अवयवदान केले ते अवयव मिळालेले पुरुष रुग्ण आज सामान्य जीवन जगत आहेत. त्यांच्या अज्ञात भगिनींनी दिलेली त्यांच्यासाठी ही सर्वात मौल्यवान भेट आहे.

बांधकामाच्या ठिकाणी खेळत होता, तेवढ्यात छातीत लोखंडी आसारी, ९ वर्षाच्या पोराने जीव गमावला
मागील वर्षी म्हणजे २०२२ साली जानेवारी ते सप्टेंबर या काळात सहा जणांचे अवयवदान झाले होते. यंदा ते २४ झाले. त्यावेळी प्रत्यक्ष अवयव प्रत्यारोपण १७ होते, तर यंदाच्या वर्षी ही संख्या ६९ आहे. सप्टेंबरपर्यंत तब्बल ६९ जणांना नवे आयुष्य मिळू शकले.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा चार ठिकाणी झेडटीसीसी कार्यरत आहे. मुंबई व पुण्यातील अवयवदानाची वाढ अनुक्रमे १६.६६ व १७.१४ टक्के आहे. त्या तुलनेत नागपुरातील वाढ लक्षणीय आहे.

गेल्या नऊ महिन्यांत नागपुरात ४४ किडनी, ३३ यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण मात्र येथे होऊ शकले नाही. एखादा रुग्ण मेंदुमृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन ही खूप मोठी जबाबदारी असते. अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आप्त दु:खात असतात आणि काही वेळा त्यांचा रोषदेखील डॉक्टरांना सहन करावा लागतो. तशा परिस्थिती त्यांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम संबंधित समुपदेशक करीत असतात. त्यामुळेच आता गरजूंना अवयव मिळू लागले आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर-२३ या काळातील प्रत्यारोपण

अवयव मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद

किडनी ५१ ५१ ४४ ११

यकृत ३१ ३२ १८ ६

फुफ्फुस ८ ०० ०० ००

हृदय १८ ०८ ०० ००

हात ४ ०० ०० ००

‘जनजागृतीमुळे वाढ’

नागपूर विभागात अवयवदानात झालेली वाढ हे या संबंधात सुरू असलेल्या जनजागृतीचे फलित आहे. लोकांना आता अवयवदानाचे महत्त्व कळू लागले आहे. मात्र अवयवांची गरज खूप मोठी आहे. सध्याचे अवयवदान ६० ते ७० पटींनी वाढले तर आपण ही गरज पूर्ण करू शकतो. अनेकजण अवयन न मिळाल्याने मृत्यू पावतात, तर दुसरीकडे पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना त्यातील अवयवही जाळले जातात. मात्र, त्या अवयांमुळे कुणाच्या तरी आयुष्यात नवी प्रकाश पेरणी होऊ शकते. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेच, पण लोकांचाही पाठिंबा आवश्यक आहे, अशी माहिती झेडटीसीसी नागपूरचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते यांनी सांगितली.

डोक्यावर नागराजासारखा मुकूट, १००० वर्ष जुनी माया योद्ध्याची मूर्ती सापडली, पाहून पुरातत्वशास्त्रज्ञ चकित
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed