जुहू येथील एका शेअर ब्रोकरने मुरादाबाद येथून एक भेटवस्तू कुरियरने मागवले होते. हे कुरियर दहा ते बारा दिवसांत येणे अपेक्षित होते. मात्र ते न आल्याने शेअर ब्रोकरने मुरादाबाद येथे संपर्क केला असता त्यांना अंजनी कुरियरचा डॉकेट क्रमांक देण्यात आला. त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधून कुरियरबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दोन रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. शेअर ब्रोकरने तयारी दाखवताच त्याला पैसे पाठविण्यासाठी लिंक देण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करून जीपेवरून पैसे पाठवत असताना ४,९९९ असे आठ वेळा काढण्यात आले. याबाबत कोणताही संदेश न आल्याने समोरील व्यक्तीने क्रेडिट कार्डचा वापर करण्यास सांगितले. क्रेडिट कार्डचा वापर करताच त्यातून ८० हजार परस्पर काढण्यात आले. एकूण एक लाख २० हजार रुपये शेअर ब्रोकरच्या खात्यातून काढण्यात आले.
पॅकेजिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करणाऱ्या मुलुंड येथील व्यावसायिकाला कल्याणमधील कोनगाव येथे एक कुरियर पाठवायचे होते. जवळचे कुरियर कार्यालय बंद असल्याने त्यांनी इंटरनेटवर जवळच्या कुरियरचा शोध घेतला. त्यावेळी विक्स कुरियरचा क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क केला असता कुरियर कार्यालयातील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवली. त्यावर व्यावसायिकाने कुरियरचा तपशील आणि स्वतःचा पत्ता पाठवला. यावर नोंदणीसाठी दोन रुपये पाठविण्यास भाग पाडून व्यावसायिकाच्या बँक खात्यामधून एक लाख ९७ हजार रुपये परस्पर वळविण्यात आले.
एटीएम कार्डसाठी ४५ हजार मोजले
धारावीतील एका गृहिणीने आपल्या गावी एका नातेवाईकाला बँकेचे एटीएम कुरियरने पाठवले. बऱ्याच दिवसांनंतरही हे कार्ड न मिळाल्याने तिने याबाबत विचारणा केली असता पत्ता अपूर्ण असल्याचे सांगून अपडेट करण्यासाठी दोन रुपये भरण्यास सांगितले. ही गृहिणी दिलेल्या लिंकवरून पैसे वळते करीत असताना तिच्या बँक खात्यामधून ४५ हजार रुपये काढण्यात आले.
गुन्हेपद्धत
– पार्सल बुकिंग करण्यासाठी लिंक पाठवली जाते.
– ॲनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूअर ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
– त्यानंतर पार्सल कुठे पाठवायचे याचा तपशील द्यावा लागतो.
– पाच रुपये ऑनलाइन पाठविण्यासाठी खात्याची किंवा कार्डची माहिती टाकायला सांगतात.
– मोबाइलचा ताबा त्यांच्याकडे असल्याने सर्व पाहता येते.
– तपशील मिळाल्यानंतर रक्कम परस्पर हवी तेथे वळविली जाते.