नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ अप्पाराव पाटील याने हा खुनी हल्ला केला आहे. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमी नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. भावकीत शेतीचा वाद हा टोकापर्यंत गेल्याने सराटी येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. फक्त विहिरीच्या पाणी वाटपाच्या किरकोळ कारणावरून शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातच आक्रोश व्यक्त करत खून करणाऱ्या संशयित आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
नरसप्पा पाटील आणि अप्पाराव पाटील यांचे शेत तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे लगत आहे. विहिरीचे पाणी सोडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी नरसप्पा पाटील हे शेतात पाणी सोडण्यासाठी विहिरीजवळ असलेलं मोटारीचे बटन चालू करण्यासाठी गेले होते. पाणी सोडण्यासाठी बटन का सुरू केले? या कारणावरून अप्पाराव पाटील हे विहिरीजवळ आले आणि वादविवाद सुरू केला. वादविवादाचे रूपांतर हाणामारीत सुरू झाले. कोयता काढून सपासप वार करण्यास सुरुवात केली. नरसप्पा पाटील यांच्या डोक्यावर, मानेवर खोलपर्यंत वार झाल्याने ते जागीच कोसळले. रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या.
अप्पाराव पाटील याने कोयत्याने सपासप वार केल्याने नरसप्पा पाटील हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. गावापासून जवळ असलेल्या अणदूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले असता दिवाळीनिमित्त रुग्णालय बंद होते. जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत नरसप्पा यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नरसप्पा यांच्या मृत्यूची माहिती डॉक्टरांनी दिल्याबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. जोपर्यंत खून केलेल्या संशयित आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. सोमवारी दुपारपर्यंत उस्मानाबाद पोलीस येऊन नातेवाईकांना आश्वासन देत होते.