• Sat. Sep 21st, 2024

तणमोरांचा महाराष्ट्रात अधिवास; गुजरातमध्ये टॅग केलेल्या २ तणमोरांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे उघड

तणमोरांचा महाराष्ट्रात अधिवास; गुजरातमध्ये टॅग केलेल्या २ तणमोरांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे उघड

मुंबई : जगभरात तणमोर हे भारतीय उपखंडामध्येच सापडतात. या तणमोरांची संख्या आता केवळ ६००च्या आसपास उरली आहे. त्यामुळे तणमोरांचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे तणमोरांविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सन २०२०मध्ये गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या १२ तणमोरांना टॅगिंग करण्यात आले. यातील तीन तणमोर महाराष्ट्रात आल्याचे त्यांच्या सर्वेक्षणात समोर आले असून, या तणमोरांसंदर्भात केलेला अभ्यास ४ नोव्हेंबरला प्रकाशित झालेल्या नेचर या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

‘अनरॅव्हलिंग द सिक्रेट्स ऑफ लेसर फ्लोरिकन – अ स्टडी ऑफ देअर होमरेंज अँड हॅबिटॅट युज इन गुजरात, इंडिया’ या शोधनिबंधासाठी मोहन राम, देवेश गढवी, आराधना साहू, नित्यानंद श्रीवास्तव, ताहीर अली राठेर, कपिल भाटिया आदींनी दोन वर्षे अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली आहेत. सन २०२० ते २०२२ या कालावधीतील तणमोरांचा अभ्यास या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शक आहे. हा तणमोर टॅग करण्याचा प्रकल्प हाती घेईपर्यंत या तणमोरांचा वावर, त्यांचा अधिवास याबद्दल सखोल माहिती नव्हती. दोन वर्षांपूर्वी टॅग केलेली मादी तणमोर चंद्रपूरजवळ मृतावस्थेत आढळली होती. ही मादी विद्युततारांना धडकून मृत झाली होती. यामुळे तणमोरांच्या प्रवासात विद्युत तारांचा होणारा अडथळा अधोरेखित झाला. त्यानंतर उरलेल्या ११ तणमोरांपैकी दोन तणमोर आपला गुजरातमधील अधिवास सोडून महाराष्ट्रात आल्याचे आढळले. २९ आणि ३० ऑक्टोबर २०२२ दरम्यान या तणमोरांनी आपले प्रजनन स्थळ सोडल्याचे दिसले.

भावनगरपासून ‘लेसर फ्लोरिकन मेल (एलएफएम) नऊ’ या तणमोराने प्रवास केला. हा तणमोर दक्षिणेकडे प्रवास करत असल्याचे आढळले. ११ नोव्हेंबर २०२२पर्यंत या तणमोराने दोन राज्यांत प्रवास केला. गुजरातमधील १६ जिल्हे आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधील १५ गावे या पक्षाने ओलांडली. नोव्हेंबर २०२२ मध्ये हा तणमोर पालघर, पुणे जिल्हा असा प्रवास करत सातारा जिल्ह्यात फलटणपर्यंत पोहोचला होता. ‘एलएफएम दहा’ या तणमोराने गुजरातमधून नोव्हेंबर २०२२पासून प्रवास सुरू केला. हा तणमोर नाशिकमधून महाराष्ट्रातून प्रवास करत अहमदनगर आणि पुढे सोलापूरपर्यंत पोहोचला. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ या कालावधीत हा तणमोर महाराष्ट्रात होता. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये तणमोराचे प्रजनन होत होते, मात्र सध्या यासंदर्भात कोणतीच माहिती हाती आलेली नाही, असे कॉर्बेट फाऊंडेशनचे संचालक केदार गोरे यांनी सांगितले.

कुरणे, गवताळ प्रदेश जपण्याची गरज

हे तणमोर आपला अधिवास सोडून इतर ठिकाणी जाण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. बाह्य घटकांमध्ये गवत, झुडुपे, शेतीच्या जागांची उपलब्धता महत्त्वाची असते. हे तणमोर महाराष्ट्रात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपलब्ध झालेला अधिवास, अन्नाची उपलब्धता याचा येत्या काळातही अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच नष्ट होत जाणारी कुरणे, गवताळ प्रदेश जपली जाण्याची गरज या अभ्यासामुळे समोर आली आहे. तसेच हे पक्षी जगावेत यासाठी विद्युत तारा, कुंपण अशा धोक्यांवर विचार होण्याचीही गरजही या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय ठरतायेत जीवघेण्या आजाराचे बळी, WHOने केलं अलर्ट, जगात सर्वाधिक रुग्णांची नोंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed