वीजचोरीविरोधात विशेष मोहीम
विजेची चोरी आणि अनधिकृत वीजवापरामुळे ‘महावितरण’च्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो; तसेच वीज वितरणाचीही हानी होते. त्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वीजचोर आणि अनधिकृत वापरकर्त्यांविरोधात एकाच दिवशी धडक मोहीम राबविण्याच्या सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिल्या. त्यानुसार, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी विशेष मोहीम राबविण्यात आली.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वीजचोरी
जिल्हा अनधिकृत वीजवापर वीजचोरीची रक्कम
पुणे ५७८ ~ ४६.१५ लाख
सोलापूर २७४ ~ १३.३८ लाख
सातारा ९२ ~ ७.३४ लाख
सांगली २०९ ~ ८.४० लाख
कोल्हापूर ९८ ~ ६.७५ लाख
वीजचोरी सिद्ध झाल्यास तुरुंगवास
वीजचोरी केल्यास विजेच्या अपघाताचा मोठा धोका असतो. त्यामुळे वीजचोरी प्रकरणात दंड आणि वीजचोरीच्या रकमेसह संपूर्ण बिल भरले नाही, तर संबंधितांवर ‘भारतीय वीज कायद्या’च्या ‘कलम १३५’नुसार, फौजदारी कारवाई केली जाते. घरगुती वीजजोडणी घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केल्यास संबंधताविरोधात ‘भारतीय वीज कायद्या’च्या ‘कलम १२६’नुसार, दंडात्मक कारवाई केली जाते. वीजचोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
विजेची चोरी केल्यास फौजदारी कारवाई आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याऐवजी अधिकृत वीजजोडणीच्या माध्यमातून सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा आणि फौजदारी कारवाई आणि कारावासाची शिक्षा टाळावी.- अंकुश नाळे, पुणे प्रादेशिक संचालक, ‘महावितरण’