राज्याची उपराजधानी नागपूर शहरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारी फोफावत आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे. तर दुसरीकडे गुन्ह्याचे स्वरूपही बदलत आहे. नागपूर पोलिसांच्या कारवाईत अवैध शस्त्रांचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. चार दिवसांपूर्वी नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत लॉज मालकाच्या हत्येचा तपास करत असताना नागपूर पोलिसांनी ९ पिस्तुल आणि ८५ जिवंत काडतुसे जप्त केली होती. २५ ऑक्टोबर रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपुरा भागात एका खाजगी गेस्ट हाऊस चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान फिरोज खान नावाच्या गुन्हेगाराने खून करणाऱ्या आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या दिल्याचे उघड झाले.
फिरोज खान याच्याकडे चौकशी केल्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील इम्रान आलम नावाचा गुन्हेगार नागपुरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर फिरोज खान आणि इम्रान आलम यांच्या दोन ठिकाणांहून ९ पिस्तुले आणि ८४ काडतुसे जप्त करण्यात आली. आता याच प्रकरणात इम्रान आलमची चौकशी केल्यानंतर आणखी ५ पिस्तुले आणि ४८ काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून नागपुरातील फिरोज खान आणि बेलाघाट येथील इम्रान आलम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज खान आणि इम्रान आलम दोन वर्षांपासून संपर्कात होते.यावेळी अनेक पिस्तुलांच्या विक्रीत त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असता, त्यातून अनेक गोपनीय माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांना होती. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी 5 पिस्तुल आणि 48 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना पुन्हा यश आले. या कारवाईतून नागपूरच्या गुन्हेगारी जगताला आणखी किती शस्त्रे पुरवली आहेत, याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.