बलात्कार, खून सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या जणांना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. बुधवारी पहाटे या कारागृहातील नंबरच्या कोठडीचे गज कापून चारही आरोपींनी पलायन केले होते. चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती.
फरार आरोपींची कार जामनेरजवळ खराब झाली अन् गेम फसला
या आरोपींना पकडण्यासाठी अहमदनगर पोलिसांची पथके रवाना झाली होती. यातील एका पथकाला फरार झालेल्या चारही कैद्यांची कार जामनेर जवळ खराब झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पथकाने आरोपींचा माग काढला, अन् जामनेरच्या दिशेने प्रवास सुरु केला. चौघेही फरार कैदी जामनेर जवळील शेळगाव शिवारातील एका शेतात लपून बसले आहेत. पोलिसांचे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास शेळगावमध्ये पोहचले आणि शेताला सिनेस्टाईल चारही बाजूने घेरले. कैद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू शिताफीने चारही जणांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. यावेळी जामनेर पोलिसांचे अहमदनगर पोलिसांना सहकार्य लाभले. तर फरार चारही कैद्यांना मदत करणारे मोहनलाल ताजी भाटी (वडगाव शेरी, पुणे), अल्ताफ असिफ शेख (पुणे) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा वृत्ताला जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.