हिंदू धर्मात गाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांची मिळून दिवाळी साजरी केली जाते. वसुबारसच्या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे पुरणाचा स्वयंपाक करतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
‘नंदा’साठी व्रत…
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, असे पुराणात सांगितले आहे. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. त्या गहू, मूग खात नाहीत. बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. यंदा शुक्रवारी धनत्रयोदशी आहे. नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन रविवारी १२ नोव्हेंबर रोजी आहे. १४ तारखेला बलिप्रतिपदा व १५ रोजी भाऊबीज आहे.