• Sat. Sep 21st, 2024
राज्यात श्वसन विकाराचा दुप्पट धोका वाढला; फटाके, थंडीमुळे रुग्णसंख्येत वाढ

नागपूर : दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, येत्या काळात हवामान खात्याने पावसाळी वातावरणाचा दिलेला अंदाज व अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायुप्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत ट्रिगरमुळे अस्थमा, सीओपीडी व अन्य फुफ्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान योग्य काळजी न घेतल्यास दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता प्रसिद्ध श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केली.

एरवी प्रदूषण म्हटले की, बाहेरील प्रदूषण एवढ्यापुरते आपण लक्षात घेतो. मात्र, दिवाळीची स्वच्छता, रंगरंगोटी, अगरबत्ती व घरात जाळायचे फटाके, यामुळे घराच्या आतही प्रदूषण होत असते. या प्रदूषणामुळे सर्दी-खोकला व दम्याचा त्रास असेल तर त्यात वाढ होते. मोठ्या बांधकामांमुळे हवेत पसरणारी धूळ, तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदुषणाचा त्रासही अनेकदा होऊ शकतो. फटाक्यांच्या धुरात सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि अन्य विषारी वायू असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसीज, ज्यांना कोव्हिड होऊन गेला आहे असे रुग्ण, कोव्हिड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुफ्फुसाशी व श्वासाशी संबंधित रुग्णांना या धुराचा त्रास होतो.

यामुळे त्यांनी विशेषत्वाने या धुरापासून दूर राहिले पाहिजे. पावसाळा संपून वातावरणात गारठा निर्माण झाला असला, तरी अधुन-मधून ढगाळ वातावरण राहते. त्यामुळे वातावरणात ओझोन वायुचा स्तर वाढतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास, अशी लक्षणे येतात व पर्यायाने त्याचे रुपांतर सर्दी-खोकला-ताप यामध्ये होते. सामान्यांसह श्वसनविकारांच्या रुग्णांना यामुळे त्रास होतो व विकार वाढतात.

श्वसनासंबंधी आजार बळावतात

जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा आपल्या शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यास वेळ लागतो. त्या वेळेसही श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फिवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम पडतो. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय करून विकार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी, असेही डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed