एकेकाळी दहशतवाद्यांचा गड असलेल्या कुपवाड्यातील भारत-पाकदरम्यानच्या नियंत्रण रेषेवर संरक्षणाची जबाबदारी ४१ राष्ट्रीय रायफल्सवर आहे. त्या ठिकाणी साडेदहा फूट उंच व जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि २१ चौरस फुटांच्या चौथऱ्यावर अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. ‘हा भगवा ध्वज तिरंग्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व देशाचे संरक्षण करणाऱ्या येथील जवानांना प्रेरणा देईल’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
२० ऑक्टोबर रोजी मुंबईतील राजभवन येथून विशेष समारंभाद्वारे हा अश्वारूढ पुतळा ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात कुपवाड्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला होता. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे २२०० किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. या अनावरणावेळी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य मान्यवर व कुपवाडा छावणीतील लष्करी सैनिक आणि अधिकारी उपस्थित होते.
पाच किल्ल्यांवरील माती
या अश्वारूढ पुतळ्यासाठी कुपवाडा येथील स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या गुढीपाडव्याच्या दिवशीच करण्यात आले होते. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी कुपवाड्यापर्यंत नेण्यात आले होते. अशा जवळपास १८०० ट्रक मातीद्वारेच तेथे चौथरा उभा करण्यात आला असून, त्यावर हा पुतळा विराजमान आहे. यानुसार एकप्रकारे किल्ल्यावर पुतळा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यासाठी कुपवाड्यात उभारणी
जम्मू-काश्मीर हे युद्धजन्य क्षेत्र म्हणून घोषित आहे. अशा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ठराविक संख्येहून अधिक लष्करी सैनिकांची तैनाती करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे अतिरिक्त तैनाती ही कागदोपत्री गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या ‘राष्ट्रीय रायफल्स’ (आरआर) अंतर्गत केली जाते. ‘आरआर’मध्ये लष्करी सैनिकांसह पोलिस, निमलष्करी दलांचे सैनिक असतात. प्रत्येक ‘आरआर’ तुकडी ही कोणत्या तरी लष्करी रेजिमेंटला समर्पित असून, त्या रेजिमेंटचे सर्वाधिक सैनिक त्यामध्ये असतात. त्यानुसार ‘१४ राष्ट्रीय रायफल्स’ ही तुकडी जवळपास ७० टक्के मराठी सैनिकांसह मराठा लाइट इन्फंट्रीला समर्पित आहे. त्यामुळेच हा पुतळा कुपवाड्यात उभारण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News