पनवेल स्थानकातून दुपारी १.१९ मिनिटांनी सीएसएमटीच्या दिशेने लोकल रवाना झाली. दुपारची वेळ आणि पनवेल स्थानकातून निघणारी लोकल यामुळे गाडीत मोजकेच प्रवासी होते. १.२४ वाजता लोकल खांदेश्वर स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते. लोकल आली देखील मात्र फलाटावर न थांबताच लोकल पुढे निघून गेली. पनवेलहून निघालेली लोकल खांदेश्वरला न थांबता थेट मानसरोवरमध्ये थांबल्याने डब्यांमधील प्रवासी पुरते गोंधळून गेले.
खांदेश्वर स्थानकात लोकल येत असल्याची उद्घोषणा झाली. गाडीत ‘पुढील स्थानक खांदेश्वर..’ अशी उद्घोषणाही झाली. गाडी थांबली नसल्याने काही प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. दरम्यान खांदेश्वरला उतरणाऱ्या प्रवाशांना मानसरोवरला उतरून अन्य पनवेल लोकलने खांदेश्वरमध्ये यावे लागले, असे प्रवाशांनी सांगितले.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी लोकल खांदेश्वरचा थांबा चुकवला असून या घटनेत कोणत्याही प्रवाशाची जखमी झालेला नाही. पनवेल-सीएसएमटी लोकलने मानसरोवरनंतर पुढील सर्व थांबे घेत सीएसएमटीमध्ये दाखल झाली. थांबा चुकवणे हा गंभीर प्रकार आहे. घडलेल्या प्रकाराबाबत लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती थांबा चुकवल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.