• Mon. Nov 25th, 2024
    फिर्यादींनी प्रतिवादी केलं, मुंबई उच्च न्यायालयाची थेट राष्ट्रपतींना नोटीस

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : देशाचे राष्ट्रपती हे देशातील कोणत्याही न्यायालयाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. मात्र, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष या नात्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना नोटीस बजावल्या आहेत. कुलाध्यक्ष या नात्याने का होईना मात्र राष्ट्रपतींना नोटीस बजावली जाण्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    हिंदी विद्यापीठातील प्रा. डॉ. एल. करुण्यकरा यांनी त्यांचे वकील फिरदोस मिर्झा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे आणि उर्मिला फाळके (जोशी) यांच्या खंडपीठाने मंगळवारी ही नोटीस बजावली. देशाचे राष्ट्रपती हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलाध्यक्ष (व्हिजीटर) आहेत. हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी काही कारणांस्तव तडाकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कायदा १९९६नुसार या पदाचा प्रभार प्र-कुलगुरूंना सोपविला जातो. मात्र, कुलगुरुंनी राजीनामा दिला तेव्हा प्र-कुलगुरुचे पद रिक्त होते. अशात या पदाचा प्रभार विद्यापीठातील सगळ्यात वरिष्ठ प्राध्यपकाला दिला जावा, अशी तरतूद संबंधित कायद्याच्या कलम २७ अंतर्गत येणाऱ्या परिशिष्ट व उपकलमात आहे. मात्र, तसे न करता विद्यापीठाच्या कुलाध्यक्षांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी हा अतिरिक्त पदभार आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेट्री यांना सोपविण्याचे आदेश दिले. या निर्णयाला याचिकाकर्त्याने न्यायालयात आव्हान दिले.

    नोटीस कुलाध्यक्ष या नात्याने संविधानाच्या १९व्या भागानुसार, देशाचे राष्ट्रपती हे देशातील कोणत्याही न्यायालयाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. मात्र, या प्रकरणी त्यांनी राष्ट्रपती या नात्याने नाही तर विद्यापीठाचे कुलाध्यक्ष या नात्याने निर्णय घेतल्याने त्यांना या प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणी नोटीस बजावली जाऊ शकते, असा युक्तिवाद ॲड. मिर्झा यांनी केला. यासाठी मिर्झा यांनी १९८२ सालच्या पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ दिला. अखेर, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला व राष्ट्रपतींना हिंदी विद्यापीठाचे कुलाध्यक्ष या नात्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली. न्यायालयाने हे प्रकरण २९ नोव्हेंबर रोजी ठेवले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *