शिक्षण मंडळाच्या बालवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना महिला बचत गटांच्या माध्यमांतून पोषण आहार देण्यात येतो. यात पोहे, उपीट, दाल खिचडी, दलिया, इडली यासारख्या अन्न पदार्थांचा समावेश आहे. शहरातील सुमारे १५० बचत गटांच्या ७५० हून अधिक महिला हा पोषण आहार तयार करतात. महापालिकेच्या शिक्षण विभागाने या पोषण आहाराचे बील दरमहा देणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासनाने मार्चपासून अद्याप हे बील दिलेच नसल्याचे समोर येत आहे. शालेय सुट्ट्यांचा महिना वगळता प्रत्येक बचत गटाचे सरासरी १५ हजार रूपये या प्रमाणे साधारण पाच ते सहा महिन्यांचे बील थकीत आहे.
सुमारे सव्वा महिन्यापूर्वी बचत गटाच्या सदस्य महिलांनी या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून आठ दिवसात बील काढण्याचे आश्वासन देत त्यांना आयुक्तांची भेट घेण्यापासून रोखले. परंतु, सव्वा महिन्यानंतरही या बचत गटांपैकी कोणाचेही बील दिले गेले नाही. त्यामुळे बचत गटांच्या प्रतिनिधींनी सोमवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांची भेट घेतली. दरम्यान, शिक्षण मंडळाने या संदर्भात ठराव केला नसल्याने बील दिले जात नसल्याचे अधिकारी सांगत असल्याचा दावा बचत गट सदस्यांनी केला आहे.
या बचत गटांची बिले का दिली गेली नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिले दिली गेली नसल्यास नेमकी अडचण काय आहे, याची माहिती घेऊन त्याची पूर्तता करून बिले दिली जातील, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी दिले आहे. बालवाडीतील मुलांना दररोज १०० ग्रॅम पोषण आहार दिला जातो. त्यापोटी प्रति विद्यार्थी ६ रुपये प्रमाणे मोबदला दिला जातो. हा दर २०१३ पूर्वीचा आहे. मात्र, या तुलनेत गॅस, धान्य, भाज्या, वाहतूक खर्चातील वाढ याचा विचार करता महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आम्हाला किमान दहा रूपये प्रति विद्यार्थी दर मिळावा, अशी मागणीही आम्ही पूर्वीपासून केली आहे. परंतु, ही मागणी मान्य होण्याऐवजी आमची पूर्वीचीच देणी थकीत राहिल्याने सर्वच बचत गटांसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत, असे लष्कर ए भीमाच्या महिला अध्यक्ष साधना मिसाळ यांनी सांगितले.