• Mon. Nov 25th, 2024

    माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; आईने स्पष्टच सांगितलं

    माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; आईने स्पष्टच सांगितलं

    पुणे: राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. याठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून काटेवाडीत मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशा पवार यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.

    गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे डेंग्यूने आजारी आहेत. अद्यापही त्यांच्या अंगात अशक्तपणा असल्यामुळे ते रविवारी काटेवाडी ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांची उणीव भरुन काढण्यासाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार सकाळी लवकरच काटेवाडी येथील मतदान केंद्रावर दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशाताई पवार यांना अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता आपली इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली. दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं, असे वाटते. दादावर लोकांचं प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. आता शेवटच आहे, मी आता ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोकांचं काय सांगता येतं?, असे आशाताई पवार यांनी म्हटले.

    राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, गुलाल कोण उधळणार?

    यावेळी आशाताई पवार यांनी अजितदादांच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. दादा आजारी आहे, त्याला अशक्तपणा आलाय. त्यामुळे तो मतदानाला आला नाही. मी १९५७ सालापासून मतदान करतेय. यंदा मतदानासाठी लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. काटेवाडीत पूर्वी काहीच नव्हते. पण आता काटेवाडीत सांगता येणार नाहीत, इतके बदल झालेत. येथील लोकही आमच्यावर प्रेम करतात, असेही आशाताई पवार यांनी म्हटले.

    काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये BJP Vs NCP, लोक म्हणाले, १०० टक्के लोक सुमित्रा ताईंच्या शब्दाला किंमत देतात!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed