• Sat. Sep 21st, 2024

इथे ग्रामपंचायतच चक्क वीज चोरते; नागपूरातील या गावांचे वास्तव सुन्न करणारे

इथे ग्रामपंचायतच चक्क वीज चोरते; नागपूरातील या गावांचे वास्तव सुन्न करणारे

नागपूर : डिजिटलायझेशनची कास धरून नागपूर आता स्मार्ट सिटी बनू पाहतेय. मात्र, याच स्मार्ट सिटीपासून अगदी ७० किलोमीटर अंतरावरील कोलितमारा गावात मोबाइल नेटवर्कसाठी धडपड करावी लागते. गाव सोडा, येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयाच बकाल अवस्थेत आहे. बिल न भरल्याने कार्यालयाची वीज कापली. आता चक्क कार्यालयासाठी बाजूच्या खांबावरून वीज चोरली जात आहे. आज, रविवारी या गटग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने भेट दिली असता, ही वस्तुस्थिती समोर आली.

-जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतीसाठी आज, रविवारी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ३६१ गावांमध्ये रविवारी मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी सोमवारी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी होईल.

-यात रामटेक तालुक्यातील कोलितमारा गटग्रामपंचायतीचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सगळ्यात सुदूर क्षेत्रातील गाव अशी ओळख असल्याने ‘मटा’ने या गावाला भेट दिली.

-सुमारे दीड ते पावणेदोन हजार मतदारांच्या या गट ग्रामपंचायतीत कोलितमारा, सुरई आणि घाटपेंढरी या गावांचा समावेश आहे. या गावाचे सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गसाठी राखीव आहे.

-सरपंचपदासाठी विद्यमान सरपंच कलीराम उईके यांच्या पत्नी विमला, रूपाली अदमाची आणि रामकली उरमले यांच्यात तिहेरी लढत आहे. या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नसल्या तरीही उईके काँग्रेस तर अदमाची शिवसेना (शिंदे गट) समर्थित आहेत.

-उरमले यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने उईकेंची डोकेदुखी वाढली आहे. याचा फायदा अदमाची यांना होईल, असाही अंदाज काही गावकरी व्यक्त करीत आहेत.

बसही नाही

‘निवडून कोणीही येवो, आम्हाला त्याचा फायदा नाही’, असे सांगताना गावकरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची झालेली बकाल अवस्था दाखवितात. या कार्यालयातील नळालाच पाणी नाही. बाजूच्या पोलवरून ग्रा. पं. कार्यालयानेच वीज चोरली असल्याचे स्वत: गावकरी दाखवितात. २२ किलोमीटर दूर असलेले घाटपेंढरी हे गाव या गटग्रामपंचायतीत येते. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून कोलितमाऱ्यातील दवाखाना बंद असल्यासारखाच आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या गावात बसही बंद झाली असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली.
गाव खातंय खस्ता, दिसंना विकासाचा रस्ता! जिल्हाधिकाऱ्यांच्या पायपीटीनंतरही खैरवाडीकरांच्या पायाला गोळेच
मोबाइल एकाच जागी ठेवा

या गावात फक्त जिओचेच नेटवर्क असून त्यातही एका दांडीपुरते नेटवर्क मिळते. ते मिळावे यासाठी घराच्या एका ठराविक ठिकाणीच मोबाइल ठेवावा लागतो, अन्यथा नेटवर्क मिळत नाही, असे गावकरी विशाल कुमरे यांनी सांगितले.

धापेवाड्यात विभाजनाचा धोका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा येथे यंदा सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी महिला) राखीव आहे. येथे भाजप समर्थित निशा खडसे आणि काँग्रेस समर्थित मंगला शेटे यांच्यात थेट लढत आहे. मात्र, काँग्रेसमधील बंडखोरीचा आपल्याला फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे. या गावात गडकरींनी केलेल्या विकासाला गावकरी दुजोरा देतात. मात्र, ‘या उड्डाणपुलाने आम्हाला रोजगार मिळालेला नाही. तो द्या, त्यासाठी कारखाने किंवा इतर काहीही प्रयत्न करा, पण रोजगार द्या’, अशी साद येथील युवा वर्ग घालत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed