पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, पोलीस स्टेशन वरुड येथील पोलीस उपनिरिक्षक दिपक दळवी यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने काही इसम गोवंश जातीचे जनावरांना निदर्यतेने दोरीने बांधले आहे. तसेच त्यांच्या हातातील बाबुच्या काठीच्या पुराणीने टोचून मारहाण करत अवैधरित्या कत्तलीसाठी विक्रीस घेऊन जात आहेत. पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्यावर पोलिसांनी जाऊन नाकाबंदी केली. दरम्यान काही इसम गोवंश जातीचे जनावरांना दोरीने बांधुन अवैधरित्या कत्तलीसाठी विक्रीस घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या इसमांना थांबवले. त्यांच्या ताब्यातील जनावरांबाबत खरेदी विक्री पावती, दाखला जनावरांचे मेडिकल याबाबत विचारपुस केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी खात्री झाली की, ही जनावरे कत्तलीसाठीच घेऊन चालले आहेत. पोलिसांनी तात्काळ सूत्र हालवत आरोपी सै. सजाद सै. बबु (४६) आणि सै. जलील सै. अमीर (३५) दोन्ही रा. नविन आमनेर यांना ताब्यात घेतले. यांच्याकडून ३७ बैल किंमत ४ लाख ७८ हजार १०० चा माल जप्त केला. जनावरांची पशुवैद्यकिय अधिकारी वरुड यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली. जनावरांना गोपाळ कृष्ण गौरक्षण संस्थान वरुड येथे दाखल केले. आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन वरुड येथे अप. क्र. ७०७ / २०२३ कलम ५ (अ), ५ ( ब ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११, (१) (क) प्राण्यांचा छळ अधिनियम, सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधीक्षक, अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक, शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वरुड, अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे नेतृत्वात पोउपनि दिलीप वळवी अंमलदार जयश्री लांजेवार, गौरव गिरी, आशिष भुंते, सैनिक शाम गुजर, मनोहर यांनी केली. याबाबत अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. गोवंश तस्कर मध्य प्रदेशातून जनावरे छुप्या मार्गाने महाराष्ट्रात आणतात. त्यांना छुप्या मार्गाने पायी आणले जाते. पुढे त्यांना विविध ठिकाणी कत्तलीसाठी पाठवण्यात येते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामीण गुन्हे शाखा सातत्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कारवाई करत आहे.