जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होणार
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासावर भर -पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि.4 : कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करुन जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय बंदरे, जलमार्ग व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी ९०० कोटी रुपयांचा आराखडा पुरातत्व विभागाने तयार केला आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महानगरपालिका आदी विभागांनी तयार केलेल्या आराखड्याबाबत आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्री आयरेकर, पुरातत्व विभागाच्या वास्तुविशारद कासार पाटील (नाशिक), अंजली कलमदानी(पुणे), आभा लांबा (मुंबई), पूनम ठाकूर (मुंबई) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण आहे. येथील अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा, असे सांगून गोव्याचा असल्यामुळे कोल्हापूरशी माझी जवळीकता असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
केंद्राकडे असलेल्या व पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पुरातत्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणुक करण्यात आली आहे. ते म्हणाले, पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील असल्यामुळे त्यांची कोल्हापूरशी नाळ जुळलेली आहे. पर्यटन विकासासाठी ते निश्चित निधी देतील. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असून त्यांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. हा निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास होवून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप वे चे सर्वेक्षण करुन अंदाजपत्रक सादर करा. तसेच किल्ल्यांचा विकास आराखडा करताना किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होईल, याकडे लक्ष द्यावे. पन्हाळा ते विशाळगड दरम्यान ट्रेकींग मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा व दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देवून राज्य शासनाकडे पाठविण्यात येत असलेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी १३.५२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजूरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड, व पारगड किल्ला या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यासह जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या त्या विभाग प्रमुखांनी केले.
*****