• Sun. Sep 22nd, 2024

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ

ByMH LIVE NEWS

Nov 4, 2023
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 4: नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तसेच दुरूस्ती व इतर अनुषंगिक कामे जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज भुजबळ फार्म नाशिक येथे लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  

या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार आदि उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे प्रलंबित कामांसह पंपींग हाऊस मधील पंपाची कामे डिसेंबर पर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. राजापूर सह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाची ४१ पाण्यांच्या टाक्यांपैकी २६ टाक्यांचे कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेची उर्वरित कामे कालमर्यादेत मे २०२४ अखेर करण्यात यावीत. लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शिल्लक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच लासलगाव विंचूरसह सोळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सौर प्रकल्पांच्या कामांसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून सौर प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महवितरणला योजनेचा डि.पी.आर सह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध

करून द्यावीत अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

 

महाबोधी वृक्षाला फुटली नव पालवी; मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बोधी वृक्षाची पाहणी

बैठकीपूर्वी शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धाना ज्या महाबोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे विजयादशमीच्या दिवशी रोपण करण्यात आले. या महाबोधी वृक्षाला नवीन पालवी फुटली आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली.

यावेळी आनंद सोनवने, भत्ने संघरत्न, भन्ते धम्मरक्षित, श्री. जेजूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बोधीवृक्षाची पाहणी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सामूहिक बोधीवृक्ष वंदना यावेळी घेण्यात आली.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed