गेली काही वर्षे अभ्यास
करोना साथरोगापूर्वी या लेणींचा अभ्यास डॉ. धनावडे आणि सहकाऱ्यांनी सुरू केला होता. मात्र, अत्यंत दाट झाडी आणि येथील जंगलामुळे त्यांचे स्वरूप समजणे अवघड होते. करोनाकाळात संचारबंदीमुळे येथे भेट देणे शक्य न झाल्याने हा अभ्यास दुर्लक्षित राहिला. या अप्रकाशित लेणींची नोंद अद्याप घेतली गेली नव्हती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) २०१८ मध्ये या लेणींची नोंद करण्यात आली, अशी माहिती डॉ. धनावडे यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.
चार शिवमंदिरे
‘पांगारे बुद्रुक गावामागील जांभ्या दगडाच्या टेकडीत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन कातळात खोदलेल्या लेण्या आणि दोन एकाच दगडात खोदलेली चार शिवमंदिरे आढळून आली आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील शैव सप्रदायशी हे लेणी संबंधित आहे. हा मंदिर आणि लेणीसमूह प्रारंभिक शैव संप्रदायापैकी एक आहे. त्याची स्थापत्यशैली आणि पुरातत्त्व वैशिष्ट्यांवरून हा लेणीसमूह घारापुरी म्हणजे एलिफंटा लेणीच्याही आधीच्या कालखंडातील आहे. यातील दोन लेणींचे स्वरूप लेणीसमोर मोकळे प्रांगण नंतर मंडप आणि पाठीमागे गर्भगृह असा तलविन्यास आहे, तर दोन मंदिरे स्वतंत्र अशा अखंड दगडात कोरलेली आहेत.
गर्भगृहाला लाकडी दरवाजा
‘एका मोठ्या मंदिराचे शिखराचा भाग हा प्राचीन स्थापत्यामध्ये आढळून येणाऱ्या ‘गजपृष्ठकार’ आहे, तर त्याहून लहान असलेल्या मंदिराचे शिखर हे चक्क कोकणात आढळून येणाऱ्या उतरत्या छपराप्रमाणे असून, या दोन्ही लेण्यांमध्ये गर्भगृहातील अधिष्ठानावर शिवलिंग प्रस्थापित केले गेले आहे. मंदिरातील गर्भगृहाला लाकडी दरवाजा बसविला जात असावा; तसेच चारही मंदिरांच्या मंडपासमोर तात्पुरत्या स्वरूपाचा लाकडी मांडव उभारत असावेत, असे त्याच्या दर्शनी भागात केलेल्या खाचांवरून लक्षात येते. या लेण्यांचा अभ्यास आणि सर्वेक्षणासाठी आम्हाला ओंकार माने, योगेश शिंदे, दीपक सकपाळ, बिपीन सावंत आणि राजापूर येथील शिक्षक उल्हास खडपेगुरुजी यांची मोलाची मदत झाली.’ असे अंजय धनावडे यांनी सांगितले.
लेणींमधील चारपैकी तीन गर्भगृहांमध्ये अधिष्ठानावर शिवलिंग असून, ते शिस्ट किंवा ग्रॅनाइट प्रकारच्या दगडापासून बनविले आहे. यातील लेणीवजा दोन मंदिरांच्या छतावर लाकडी तुळयांसारखा भाग असून, लाकडात उभारल्या जाणाऱ्या मंदिरांची ती नक्कल आहे. या वैशिष्ट्यांवरून ही लेणी कदाचित तिसऱ्या-चौथ्या शतकातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीने कोकणाचा अभ्यास अधिक सूक्ष्म पद्धतीने करणे गरजेचे आहे. हे कोकणातील पाशुपत संप्रदायाचे महत्त्वपूर्ण आणि प्रभावी केंद्र असावे.
– डॉ. अंजय धनवडे, पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास अभ्यासक
परिसरातील निरीक्षणे
– राजापूर हे कोकणातील बंदर असून, समुद्रामार्गे येणारा व्यापारी माल अर्जुना नदीच्या अंतर्गत भागात राजापूरपर्यंत येत होता. येथून तो घाटमाथ्यावर कोल्हापूर परिसरात जात होता. या मार्गावर उभारलेली शैव लेणी ही येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या मदतीने व्यापाऱ्यांनी उभारली असावीत.
– राजापूर हे शैव केंद्र असून ते तेथील धुतपापेश्वर या शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या लेण्यांवरून पाचव्या आणि सहव्या शतकापासून हा परिसर शैव केंद्र म्हणून प्रसिद्ध आसावा.
– या काळात कोकणात त्रैकुटक या राजघराण्याची आणि नंतर मौर्य घराण्याची सत्ता होती. या लेणी या राजघराण्यातील लोकांनी दिलेल्या आश्रयाने निर्माण झाल्या असाव्यात.
– भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आतापर्यंत आढळून आलेल्या या सर्वांत प्राचीन शैवपंथी हिंदू लेणी ठरण्याची शक्यता आहे.