प्रिती भास्कर घुडे (45) या कल्याणच्या मंडळ अधिकारी असून त्यांच्या फिर्यादीवरून माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष सुयश शिर्के (सातवाहन) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471, 473 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी प्रिती घुडे यांनी कल्याण तहसीलदारांच्यावतीने ही फिर्याद दाखल केली आहे. 12 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष सुयश शिर्के (सातवाहन) यांनी मौजे कल्याण येथील कब्जेदार सदरी दुर्गाडी किल्ला असे नावे दाखल असलेल्या सर्व्हे नंबर 338 (एकूण क्षेत्र 1-16-00 हेक्टर आर) ही जमीन समितीच्या नावावर दाखल करण्यासाठी 26 जून 2014 रोजी अर्ज दिला होता. सदर अर्जासोबत अर्जदाराने काही कागदपत्रे जोडली होती. या कागदपत्रांमध्ये दुर्गाडी किल्ल्याचा 7/12 उतारा, फेरफार याचाही समावेश होता. हा किल्ला माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीच्या नावे असलेले 8 मे 2021 तारखेचे पत्र जोडण्यात आले होते.
महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी या पत्राचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर पत्र बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केले असता तहसीलदारांच्या नावाच्या बनावट लेटरहेडची कागदपत्रे बनवून त्यावर तहसीलदार कार्यालय प्रमुखाची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून ते लेटरहेडवर उमटवले. ही सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात दाखल करून ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गाडी किल्ला क्षेत्राच्या अभिलेखामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केल्याचे मंडळ अधिकारी प्रिती घुडे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकस तपास सुरू केला आहे.