अजितदादांच्या त्या प्रकरणाचे पडसाद, बोरवणकर यांचं तिकीट कॅन्सल
मीरा बोरवणकर म्हणाल्या, “पुण्यात दकनी अदाब फाऊंडेशन (Dakani Adab Foundation) मागच्या एक महिन्यापासून मला ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हल’ला आमंत्रित करण्यासाठी माझ्या संपर्कात होते. तुमचे पुस्तक प्रकाशन होतेय, तुम्ही त्यावर बोलले पाहिजे, असे ते मला सांगत होते. त्यावेळी मी चंदीगड फेस्टिव्हलचे आमंत्रण स्वीकारले आहे. मला चंदीगडवरून यावं लागेल, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मला विमानाची तिकीटे काढून पाठवली. डेक्कन फेस्टिव्हलमध्ये आपले प्रमुख व्याख्यान असेल. आपण कृपा करून यावे, अशी विनंती त्यांनी मला केली”.
“अजितदादांच्या पुस्तकातल्या प्रकरणावरून राज्यात जो गजहब निर्माण झाला, त्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. त्यांनी पुढच्या काही दिवसांतच मला तोंडी सांगितलं की, सध्या काही जमणार नाही आणि लेखी दिलं की तुमचं सेसन ओव्हरलॅप होतंय. पण जर सेशन ओव्हरलॅप होतंय, तर त्यांनी मला विचारायला हवं होतं की तुम्हाला काही अॅडजस्ट करता येतंय का..? पण त्यांनी काहीही न विचारता थेट माझं विमानाचे तिकीट कॅन्सल केलं. अजितदादांविषयी पुस्तकात लिहिलेल्या त्या प्रकरणानंतर असे भरपूर परिणाम झाले, होतायेत..” असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.
अजितदादांनी माझ्यावर दबाव आणला, पण मी स्पष्टपणे सांगितलं की….
येरवडा पोलीस स्टेशनची जागा होती, त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे बिल्डरचे प्लॉट होते. त्याच्या बरोबर मधोमध पोलिसांची जागा असल्याने संबंधित बिल्डरला ती जागा हवी होती. पुण्याचे तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी ती जागा मला संबंधित बिल्डरला देण्याविषयी सांगितलं, त्यावेळी मी सक्त नकार दिला. त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण मी माघार घेतली नाही. त्यावेळी मी अजित पवार यांना सांगितलं, ही पोलिसांची जागा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांत पुन्हा अशी जागा पोलिसांना मिळणार नाही. त्यामुळे मी ही जागा देणार नाही, असं स्पष्टपणे अजितदादांना सांगितल्याचं मीरा बोरवणकर म्हणाल्या.
येरवडा फक्त एक उदाहरण, राज्यात इतरही अनेक जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात
“आमच्याकडे दोन नवे अतिरिक्त आयुक्त आले होते, त्यांना बसायला देखील ऑफिस नव्हते. मग अशी परिस्थिती असताना संबंधित जागा मी खासगी बिल्डरला देऊच शकत नव्हते. पण येरवाड्याचं केवळ एक उदाहरण नाहीये. राज्यात अशी अनेत उदाहरणं आहेत, जिथे राजकीय नेत्यांनी बिल्डरांचं भलं करण्यासाठी लिलाव करून त्यांना जागा दिलेल्या आहेत. यामध्ये पोलिसांच्या जागांचं सगळ्यात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर इतर देखील विभागांच्या जागा खासगी बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत, असे मोठे वक्तव्यही बोरवणकर यांनी केले.