• Sat. Sep 21st, 2024

पनीर खाताय तर सावधान! पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉगची सर्रास विक्री, कशी ओळखाल भेसळ?

पनीर खाताय तर सावधान! पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉगची सर्रास विक्री, कशी ओळखाल भेसळ?

मुंबई : पांढरेशुभ्र, मऊसूत, प्रत्येक घासासरशी विरघळत जाणारे पनीर कुणाला आवडत नाही… परंतु दुकानांतून, डेअरीतून विकत घेताना वा हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर तुमच्यासमोर येणारा पदार्थ हा अस्सल पनीरच आहे ना, याची खातरजमा करून घ्या! मागील सहा महिन्यांत पनीरऐवजी चीज अॅनालॉग देण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.

दिसायला हुबेहूब पनीरसारखे पांढरेशुभ्र असलेले चीज अॅनालॉग हे पनीरपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळते. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक करून वारेमाप नफा कमावण्यासाठी हे प्रकार सर्रास सुरू आहेत. या दोन्ही पदार्थांमध्ये भेद करता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. पनीर हे शुद्ध दूध नासवून केले जाते. त्यामुळे दोन लिटर दूधापासून जेमतेम पाव किलो पनीर मिळू शकते. चीज अॅनालॉगमध्ये दुधाची पावडर आणि वनस्पती तेलाचा वापर करण्यात येतो. ‘एफएसएसएआय’ने चीज अॅनलॉगला मान्यता दिल्यामुळे ‘एफडीए’चेही हात बांधलेले आहेत. या पदार्थाचा वाढता गैरवापर ‘एफएसएसएआय’च्या लक्षात आला असला तरीही ते बाजारातून मागे न घेण्यासाठी एक मोठा दबावगट काम करत असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पनीरच्या पदार्थांची फूड इंडस्ट्रीमधील एकूण आर्थिक उलाढाल लक्षात घेऊन अधिक नफा मिळवण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत.

सामान्यांनी कोणते प्रश्न विचारायला हवेत?

डेअरीमधून वा इतर कोणत्याही ठिकाणाहून पनीर विकत घेताना ग्राहकांनी हे पनीर आहे की, चीज अॅनालॉग, हा प्रश्न विक्रेत्यांना विचारायला हवा. घरगुती स्वरूपामध्ये उत्तम दर्जाच्या पनीरची चाचणी करायची असल्यास सुई वा बारीक काडीसारखा पदार्थ पनीरमध्ये घालून पाहिल्यास ते सुईला चिकटत नाही. वनस्पती तेलाचा वापर केलेले अॅनालॉग मात्र चिकटते. उत्तम गुणवत्तेचे पनीर हे अतिशय मऊसूत व चविष्ट असते, तर अॅनालॉग हे चिवट आणि बेचव असते.
पाणी प्रकल्प मुंबईकरांसाठी की कंत्राटदार-राजकीय नेत्यांसाठी? काम सुरु होण्याआधीच वाढला खर्च
अशी शोधतात पळवाट…

घाऊक स्वरूपामध्ये चीज अॅनालॉगची विक्री करणारे उत्पादक हे मोठ्या आकाराच्या लाट्यांच्या स्वरूपामध्ये विक्री करतात. त्यावर साध्या प्लास्टिकचे आवरण असते. ते पनीर म्हणून विकले जाते. त्यात कोणते घटक आहेत याचा उल्लेख नसतो. विक्रेते त्याचे बिल देत नाहीत. बिल दिल्यास त्यावर पनीर म्हणून उल्लेख केला, तर अडचणीत येऊ या भीतीने ही माहिती दिली जात नाही.

वेगळा रंग हवा

खाण्याच्या व साठवणूक करण्यात येणाऱ्या बर्फाच्या रंगातील फरक कळण्यासाठी वेगळ्या रंगाचा वापर करण्याचे निर्देश ‘एफडीए’ने दिले होते. त्याचप्रकारे चीज अॅनालॉगचा रंग गडद पिवळा करावा अशी मागणी केली जात आहे. पनीर म्हणून चीज अॅनालॉगची विक्री वाढली असून ती अवैध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनीही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed