मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. रास्ता रोको देखील केले जात आहे. बुधवारी नायगाव तालुक्यातील कृष्नूर येथे नांदेड-हैदराबाद महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलकाकडून दगदफेक आली. या दगडफेकीत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे जखमी झाले होते. त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तसेच इतर चार पोलीस अधिकाऱ्यांसह १० पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कुंटूर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर ४१ जणांना ताब्यात घेतले आहे.
समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांसहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर कोणी गालबोट लावत असेल तर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अशा लोकांना बाजुला करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. शांतता, कायदा, सुव्यवस्थेला जर कोणी आव्हान देत असेल तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायदेशीर बडगा आम्ही उगारून कठोर कारवाई करू, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिला आहे.
रास्तारोको दरम्यान संतप्त जमावाने अंबडचे आमदार राजेश राठोड यांच्या गाडीवर दगडफेक केली. नांदेड जिल्ह्यातील कहाळा येथे ही घटना घडली. नायगाव तालुक्यातील कहाळा येथे काल सकल मराठा समाजाचा रास्तारोको होता. अंबडचे आमदार राजेश राठोड हे इनोव्हा गाडीने नांदेडकडून हैद्राबादकडे जात होते. गाडी आंदोलनस्थळी येताच गाडी रोखून आंदोलकांनी दगडफेक केली. चालकाने मुख्य रस्त्यावरून गाडी गावात वळवली. गाडी जाळण्याचा प्रयत्न आंदोलक करत होते पण अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी धावत परिस्थिती नियंत्रणात आणली.