मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मढवी हा तळोजा जवळील एका गावात राहतो. त्याचे लग्न कल्याण पूर्वेत राहत असलेल्या दीक्षिता खोकरे हिच्याबरोबर झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. काही महिन्यांपासून दीक्षिता आणि पती भावेश यांच्यात कौटुंबिक कारणातून भांडणे होत होती. भांडणाला कंटाळून ती कल्याणमधील आपल्या आईच्या घरी आली होती. पत्नी आणि मुलाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी जावई भावेश आणि त्याचा मित्र सुरज म्हात्रे वाहन घेऊन कल्याण पूर्वेतील अमरदीप वसाहत भागात आले. घरात आल्यानंतर भावेशने पत्नी कुठे आणि मुलाला कोणाला विकले का, असे रागाच्या भरात प्रश्न केले.
तुम्ही माझ्या पत्नी, मुलाचे काही तरी वाईट केले आहे, असा आरोप करत भावेशने सासू दिपालीला चाकुचा धाक दाखविला. आम्ही तुम्हाला आता पोलीस ठाण्यात नेतो. पोलीस ठाण्यात नेण्याचे खोटे कारण देत भावेश, सूरजने सासूला जबरदस्तीने स्वत:च्या वाहनात बसविले. त्यानंतर तळोजा येथील घरी नेऊन डांबून ठेवले. तेथे तिला लोखंडी सळई, कात्रीने मारहाण करण्यात आली. आई कुठे गेली म्हणून दीक्षिता आईचा शोध करत होती. तिला पती भावेशचा फोन आला.
आई माझ्या ताब्यात आहे. तू मुलाला माझ्या ताब्यात दे, असे सांगितले. दीक्षिताने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीय मानपाडा पोलिसांना घेऊन तळोजा येथे पोहचले. तेथे दिपाली जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी सासू दिपालीची भावेशच्या ताब्यातून सोडवणूक केली. भावेश, सुरजला तात्काळ अटक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.