महाराष्ट्र सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत न्या. शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारला असून ज्यांच्याकडे कुणबी पुरावे असतील त्यांना दाखले देण्याची कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला जरांगे पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला. अर्धवट अध्यादेश काढू नका. आम्ही ते दाखले वाटू देणार नाही. सरसकट आरक्षण द्या, ही आमची भूमिका आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
फडणवीसांचा एकेरी उल्लेख, खुलं आव्हान, जरांगे भडकले
हिंसक आंदोलकांवर गुन्हे दाखल करू, या गृहमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर जरांगे चांगलेच संतापले. ते म्हणाले, आमदारांची घरं कुणी जाळली आम्हाला माहिती नाही, आंदोलनात तुमचेच लोकं घुसवतात आणि तुम्हीच जाळपोळ करून आमच्यावर आरोप करता. आमच्या पैशावर बासुंदी, गुलाबजामुन खाल्ले, तुम्हाला काय करायचे ते करा… तुम्ही किती ताकदवर आहे आम्हालाही बघायचंय, करा ३०७ दाखल आमच्यावर… असं जाहीर आव्हानच देतानाच त्यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला.
फडणवीसांना आयुष्यात दुसरं काय आलं?
पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांना (फडणवीस) आयुष्यात दुसरं काय आलं? तुमच्यासारख्या लोकांमुळेच भाजप संपायला लागला आहे. यांनी सगळे रंगीबेरिंगी आणून ठेवले आहेत. त्यामुळं सगळीकडच्या राज्यात भाजप रिव्हर्स यायला लागले आहेत”
उद्या मी पाणी सोडणार, पुढच्या स्थितीला तुम्ही जबाबदार
आम्ही आमचं आंदोलन शांततेत करणार आहोत. वातावरण जाणून बुजून खराब करू नका. जर उद्यापर्यंत आरक्षणासंबंधी ठोस पावलं उचलली नाही तर उद्यापासून मी पाणी सोडणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलवली आहे. मग आज काय दिवसभर काय करत होते? नुसती बैठक झाली म्हणता, तुम्हाला आज रात्र आणि उद्या दिवस तुमच्याकडे आहे. जाती एकमेकांच्या अंगावर घालू नका, असे ते म्हणाले.