• Sat. Sep 21st, 2024

वाहतूक बदल बासनात! ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम

वाहतूक बदल बासनात! ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या वाहतूक बदलानंतर अनेक ठिकाणी कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने हे बदल बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिका व वाहतूक पोलिस प्रशासनावर आली आहे. यात माजिवडा आणि कापूरबावडी चौकांतील दुभाजक हटवून मुंबई-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडील वळण खुले करून देण्यात आले आहे. तर, आराधना टॉकीज वळण रस्त्यावर ‘हाइट बॅरिअर’ बसवण्यात आले. त्यामुळे या चौकात होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाहतूक बदलांचा हा ‘यू टर्न’ स्वागतार्ह असला तरी गोखले रोड व सर्व्हिस रोडवरील दुभाजकांमुळे होणारे अपघात आणि कोंडीही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांसह घोडबंदर रोड येथेही अनेक वळण रस्ते बंद केले. या रस्त्यांमधील काही वळण रस्ते रातोरात तर, काही ठिकाणी तात्पुरते दुभाजक लावून तात्काळ बंद करून ही वाहतूक पर्यायीमार्गे वळवली. अशाच पद्धतीने ठाण्यातील अत्यंत व्यग्र जंक्शन अशी ओळख असलेल्या कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने ठाण्याहून येणाऱ्या वाहनांना मुंबई-नाशिक महामार्गाकडे जाण्याचा मार्ग दुभाजक बसवून बंद करण्यात आला होता. त्यामुळे माजिवडा गाव, लोढा गृहसंकुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना फटका बसत होता. ही वाहने वळण घेण्यासाठी कापूरबावडी चौकात जात होती. मात्र याठिकाणी आधीच कशेळी, काल्हेर, बाळकूम, कोलशेत या भागात जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत असल्याने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी स्थानिकांवर ३० ते ४० मिनिटे कोंडीत अडकून पडण्याची वेळ येत होती. अखेर स्थानिकांनी याप्रश्नी वाहतूक शाखेसह पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून समस्या मांडली. अखेर या भागातील दुभाजक हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच, आराधना टॉकीज वळण रस्त्यावर दुभाजक हटवून केवळ हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला होता. मात्र येथून बस, टेम्पो, ट्रक वाहतूक करत असल्याने कोंडीची समस्या कायम होती. अखेर याठिकाणी ‘हाइट बॅरिअर’ बसवून मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हलक्या वाहनांचा मार्ग सुकर झाला आहे.

सर्व्हिस रोड पार्किंगमध्ये अडकले

विवियाना मॉल, ज्युपिटर रुग्णालयाबाहेरील सर्व्हिस रोडवर केवळ दुतर्फा पार्किंग होत नसल्याने येथील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत राहते. मात्र घोडबंदर रोड येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ कोंडीच्या वेळी हलक्या वाहनांना सर्व्हिस रोडचा वापर करताना दुतर्फा असलेल्या पार्किंगमुळे कोंडीत अडकावे लागते. याठिकाणी वाहतूक शाखेने कार शोरूम, हॉटेल्स, दुकानांबाहेरील उभ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
मराठवाड्यात एसटी बंद; तोडफोडीच्या घटनांमुळे प्रशासनाचा निर्णय, ठिकठिकाणी प्रवाशांचे हाल
‘कोंडीचे ‘आयआयटी’कडून सर्वेक्षण करा’

ठाणे शहरातील पार्किंग व वाहतूककोंडीच्या अनुषंगाने अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई आयआयटीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी ठाणे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहरातील अनेक भागांत वाहतूककोंडी आणि पार्किंग समस्येमुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. यावर कायमस्वरूपी व दूरगामी विचार करून तोडगा काढणे आवश्यक आहे. येथील वाहतूककोंडी व पार्किंग समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आयआयटीच्या माध्यमातून सर्वेक्षण करावे, अशी मागणी पाटील यांनी या पत्रातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed