• Mon. Nov 25th, 2024

    राजकीय नेत्यांचा लहरीपणा, नाशिकमधील स्पर्धा मुंबईत होणार, खेळाडूंना मनस्ताप

    राजकीय नेत्यांचा लहरीपणा, नाशिकमधील स्पर्धा मुंबईत होणार, खेळाडूंना मनस्ताप

    नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वयोगटाच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा या १ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केल्या होत्या. परंतु, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व मुंबईचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विनंतीनुसार यातील १७ वर्ष मुले व १९ वर्ष मुली वयोगटाच्या स्पर्धा ऐनवेळी मुंबई येथे घेण्याचे ठरविण्यात आले. यामुळे स्पर्धा पुढे ढकलल्याने खेळाडूंना पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या मनमानीचा फटका बसला असून, महाराष्ट्रातील खेळाडूंनी ऐनवेळी मुंबईला पोहचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    राज्य सरकारच्या क्रीडा विभाग व नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १९ जुलै रोजी स्पर्धा आयोजनाबाबत पत्र काढण्यात आले. या पत्रामध्ये १४, १७ व १९ वयोगटाच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत विभागीय क्रीडासंकुल, नाशिक होतील असे कळविण्यात आले. या आशयाचे पत्र सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये व संबंधित खेळाडूंना पाठविण्यात आले. त्यानुसार राज्यातील नागपूर पासून ते कोकण तसेच राज्यातील विविध भागातील खेळाडूंनी नाशिकला जाण्याची तयारी केली अनेकांनी रेल्वेचे बसचे आरक्षणदेखील केली. मात्र, स्पर्धेच्या सहा दिवस अगोदर या शुक्रवार २६ ऑक्टोबर रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यात १७ वर्ष वयोगटाची मुले व १९ वर्ष वयोगटाच्या मुली यांच्या स्पर्धा या नाशिक येथे न होता त्या मुंबई येथे होतील असे सांगण्यात आले. म्हणजेच पूर्वीच्या नियोजनानुसार १४ वर्ष मुले मुली, १७ वर्ष मुली व १९ वर्ष मुले यांच्या स्पर्धा नाशिकलाच होणार आहे. या निर्णयामुळे एका ठिकाणाहून येणारे अर्धे खेळाडू नाशिकला, तर अर्धे खेळाडू मुंबईला जाणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू नाशिकला येणार होते. परंतु, या स्पर्धा अचानक दुसऱ्या जागी आयोजित केल्याने खेळाडूंनी मुंबईला पोहचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सध्याची आरक्षित असलेली तिकीटे रद्द करावी लागली असून, त्यामुळे हजारो रुपयांचे भूर्दंड खेळाडूंना व त्यांच्या पालकांना बसला आहे.
    Nashik News: जिल्ह्यात होणार उसाची पळवापळवी; घटलेल्या पर्जन्यमानाचा साखर कारखान्यांना बसणार फटका
    आम्हाला पहिले पत्र १९ जुलै रोजी मिळाले. त्यादृष्टीने आम्ही सरावाला लागलो व रेल्वे आरक्षण करून ठेवले. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर २६ नोव्हेंबरला बालेवाडी येथून अचानक दुसरे पत्र पाठविण्यात आले. या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले त्यामुळे अनेक खेळाडूंची तिकीटे रद्द करावी लागली. त्याचा अर्थिक भूर्दंड आम्हाला बसला, तथापि मुंबईच्या स्पर्धा कधी होतील हे माहित नसल्याने वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आमचा सर्व सराव वाया गेला.- एक प्रशिक्षक

    नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेत वेळेवर बदल करावा लागला. स्पर्धा सगळीकडे व्हाव्यात हाच एकमेव उद्देश यामागे आहे. कम्युनिकेशनमध्ये वेळ लागला पुढील वेळी योग्य ती दक्षता घेतली जाईल.- उदय जोशी, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *