शिवाजी पार्क मैदानात अनेक क्लब आणि खेळपट्ट्या असून क्रिकेटचे सराव आणि सामने होतात. तसेच सकाळी-सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात येतात. मैदानातील माती उडून ती धूळ आसपासच्या इमारतींमध्ये जाते आणि रहिवाशांना त्याचा मोठा त्रास होतो. नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुंबई महापालिकेने मैदानातील हिरवळ कायम ठेवणे, नवी हिरवळ लावणे, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे यांसाठी शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय साधारण आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती टाकली होती.
या मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठी पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी ३५ विहिरी बांधण्यात आल्या. मात्र हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालाच नाही. यासाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र तो व्यर्थ गेल्याचा आरोप शिवाजी पार्क परिसरातील स्थानिकांकडून केला जात आहे. मैदानातील माती उडून ती धूळ परिसरातील रहिवाशांच्या घरात जात आहे. यावर मुंबई महापालिकेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपाययोजनांची मागणी करूनही उपाय करण्यात यश आले नसल्याचे स्थानिक रहिवाशी प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले. यासाठी शुक्रवारी काही स्थानिकांनी आंदोलनही केले. धुळीमुळे स्थानिकांना श्वसनाचेही त्रास होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
३५ विहिरींमधील पाण्याचा वापर
शिवाजी पार्कमध्ये ३५ विहिरी असून यातील काही विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर फवारून धूळ थोपविली जात असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. तसेच मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला आहे. या मैदानासाठी पालिकेने तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पामध्ये पर्जन्य जलपुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन विहिरी तयार करण्यात आल्याचे सांगितले. महापरिनिर्वाण दिनानंतर धूळ प्रदूषण विषयक कामे हाती घेण्यात येतील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News