• Sat. Sep 21st, 2024
नशेचं नवं डेस्टिनेशन! माफिया होण्यापूर्वी ‘सेटअप’, महिन्याभरापूर्वी करार अन्….

नाशिक : एकाच दिवसात शेकडो किलो एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यासाठी भल्यामोठ्या यंत्रसामग्रीचा ‘सेटअप’ उभारलेल्या सोलापुरातील कारखान्यात नाशिक पोलिसांनी धाड टाकली. ड्रग्ज माफिया होऊ पाहणाऱ्या संशयित सनी पगारे याने महिनाभरापूर्वीच कायदेशीर करारांतर्गत कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. तेथे कोट्यवधींचे ड्रग्ज तयार होण्यापूर्वीच टोळीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी मनोहर पांडुरंग काळे (रा. नाशिक) यासह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शाखेंतर्गत तयार केलेल्या पथकांनी संयुक्तरित्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एमआयडीसीत एमडी तयार होणारा कारखाना उद्ध्वस्त केला. पथकाने कारखान्यातून तीन कोटी रुपयांचे एमडी, साठ लाख रुपयांचा कच्चा माल व दहा लाखांचे रसायन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे उपस्थित होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात सप्टेंबर महिन्यात दाखल १२.५ ग्रॅम एमडी तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी पथकांना दिले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, विजय ढमाळ यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत फड, किरण रौंदळ यांनी सापळा रचला. तर, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार संजय ताजणे, बाळा नांद्रे, गणेश वडजे, योगेश सानप, अनिरुद्ध येवले, चंद्रकात बागडे, प्रवीण वाघमारे, अर्चना भड यांनी कारखान्यात धाड टाकली.

पोलीस तपासातून…

– सनी पगारे हा मोठ्या प्रमाणात एमडी तयार करणार होता

– सनीने सप्टेंबर २०२३ मध्ये सोलापुरात एका कारखान्याशी करार केला

– मनोहर पांडुरंग काळे (रा. नाशिक) हा ताब्यात

– अक्षय नाईकवाडे (रा. नाशिक) फरार. हा सराइत गुन्हेगार आहे. तत्कालीन आयुक्त दीपक पांडे यांनी त्याला स्थानबद्ध केले होते

– कारखान्यातून माल कुठे गेला, आतापर्यंत किती माल तयार झाला, आर्थिक गुंतवणूक कोणाची होती, फॉर्म्युला कोणाचा होता, कारखान्यात कोण काम करायचे यासंदर्भात तपास सुरू

– या गुन्ह्यात आतापर्यंत गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे हे आठजण अटकेत

संशयित : जप्त एमडी : किंमत

गणेश संजय शर्मा : १२.५ ग्रॅम : ६२,५०० रुपये

अर्जुन सुरेश पिवाल : ५८ ग्रॅम : २ लाख ९० हजार

मनोज भारत गांगुर्डे : १ किलो २७ ग्रॅम : ५१ लाख ३५ हजार

सनी अरुण पगारे : २ किलो ६३ ग्रॅम : १ कोटी ३ लाख

सोलापूर कारखाना : ६ किलो ६०० ग्रॅम : ३ कोटी ३० लाख

सोलापूर कारखाना : १४ किलो २५३ ग्रॅम (एमडी सदृश्य) : २ कोटी ८४ लाख ८६ हजार रुपये

सोलापूर कारखाना : ३० किलो कच्चा माल : ६० लाख रुपये

सोलापूर कारखाना : रसायन, द्रव्य व इतर साहित्य : ३५ लाख रुपये

४ दिवस मुक्काम, अहोरात्र तपास

नाशिक पोलिसांनी सोलापुरात चार दिवस मुक्काम ठोकत कारखान्यातील हालचालींवर नजर ठेवली. तेथे एमडी साठ्यासह मुद्देमाल असल्याची माहिती निश्चित होताच इतर कुमक मागविण्यात आली. नाशिकहून पथक पोहोचल्यावर धाड टाकून नशेची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली. तर, ५ ऑक्टोबरपासून नाशिकमध्ये एमडीसंदर्भातील तीन गुन्ह्यांचा कसून तपास सुरू आहे. पथकांतील नऊ अधिकारी व ३५ अंमलदारांचा अहोरात्र तपास सुरू असल्याने वीस दिवसांत तीन गुन्ह्यांत पंधरा संशयितांना अटक झाली आहे.

लॅबनंतर फॅक्टरी…

श्री स्वामी समर्थ कंपनीत यापूर्वी फरशी पुसण्यासाठीचे केमिकल तयार व्हायचे. व्यवसाय तोट्यात असल्याने मालकाने काही दिवसांपूर्वीच सनी पगारे याला रीतसर अकरा महिन्यांच्या करारावर कंपनी दिली. तेथे सनीने एमडीचा ‘उद्योग’ सुरू केला. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरात धाड टाकलेल्या कारखान्यांपासून सनीचा यापूर्वीचा कारखाना जवळ होता. घाबरलेल्या सनीने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या जागेत फॅक्टरी हलविण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी तेथे लॅब उभारून काही किलो एमडी तयार केले. मोठ्या प्रमाणात एमडी तयार करण्यासाठी बराच कच्चा माल आणला होता.

एमडी विक्रेत्यांपासून तयार करणाऱ्यांपर्यंत पथके पोहोचली आहेत. सोलापुरात कारखाना असल्याने नाशिकसह तेथील संशयितांचाही सहभाग आहे. तीनही गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणांत संशयित असलेल्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई होईल.

– अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed