सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे शत्रुघ्न याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी बोलणं करून दिले होते . घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे.
सुप्रिया सुळे यांचं संयम राखण्याचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद यांनी आत्महत्या केली. ही अतिशय दुःखद बातमी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरक्षणाचा लढा सुरू असताना शासनाच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांमध्ये नैराश्य आणि संताप एकाच वेळी उफाळून आला आहे. शासनाला नम्र विनंती आहे की कृपया आपण पुढाकार घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा. खास विविध समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असं देखील त्या म्हणाल्या.
सरकारनं समाजातील तरुणांचे अशा पद्धतीने बळी जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावी ही विनंती करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. समाजातील तरुण-तरुणींनी कृपया आपण संयम राखावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कोणीही कृपया टोकाचे पाऊल उचलू नये. असं त्या म्हणाल्या. शत्रुघ्न काशीद यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या संवेदना काशीद यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News