ह्या पार्श्वभूमीवर ‘बियर प्रेरित विकास आम्हाला नको’ अशी भूमिका महाराष्ट्र अनिस मार्फत राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोळकर मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या मार्फत दिली आहे. ह्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, जगभरात झालेल्या अनेक अभ्यासाच्या मध्ये परत परत असे सिद्ध झाले आहे की दारूच्या महासुलावर अवलंबून असलेला विकास हा समाजाला घातक असतो. दारूच्या विक्रीमधून मिळणाऱ्या महसुलातील कमाई आणि दारूच्या विक्रीमधून होणारे आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक शैक्षणिक नुकसान यांचा एकत्रित विचार केला. तर दारूतून होणारे नुकसान हे खूप अधिक ठरते, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन ने देखील नमूद केले आहे. त्यामुळे असा उलट्या पावलांचा निर्णय शासनाने घेवू नये, असे आवाहन देखील या पत्रात करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे गुजरात शासनाला दारू पासून मिळणारे उत्पन्न हे नगण्य आहे. जर गुजरात हे राज्य दारूवरील महसूलाशिवाय चालू शकते तर महाराष्ट्रातील लोकांच्या माथी हा दारू विक्री प्रेरित मारू नये, अशी अपेक्षा देखील या पत्राच्या द्वारे व्यक्त केलेली आहे. या पत्रकात पुढे नमूद केले आहे की दारु आणि इतर व्यसनाच्या पदार्थांच्यावरील कर वाढवून त्यांची विक्री कमी होते. हा जगभरात सिद्ध झालेला मार्ग आहे. त्यापासून शासनाने माघार घेवू नये. उलट टप्पा टप्प्याने हा कर वाढवत न्यावा आणि दारूच्या महसुलाच्या शिवाय शाश्वत विकास साधण्यासाठी दारूच्या महासुलातून मिळणाऱ्या कराचे शासनाचे अवलंबित्व कमी करण्याचे ठोस धोरण जनतेसमोर मांडावे, असे देखील या मध्ये नमूद केले आहे.
एका बाजूला दारू बंदीची मागणी आणि दुसऱ्या बाजूला ती यशस्वी होत नाही म्हणून दारूला मुक्त परवाना आणि दारू विक्री प्रेरित विकास या दोन्ही टोकाच्या मधल्या टप्प्या टप्प्याने दारूच्या महसुलावरील अवलंबित्व कमी करणारा आणि त्याच बरोबर समाजात गाव पातळीवर व्यसनमुक्तीसाठी शासकीय सुविधा उपलब्ध करून देणारा मार्ग शासनाने निवडावा, अशी अपेक्षा देखील या वेळी व्यक्त करण्यात आली.
शासनाने बियर प्रेरित विकासाच्या समाज घातकी निर्णयाला संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी महाराष्ट्र अनिस प्रबोधन अभियान चालवणार आहे. या अभियानात जिल्हा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत शासनाला नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे. तसेच सोशल मीडिया जनजागृती देखील चालवली जाणार आहे. बियर विषयी समाजात असलेले गैरसमज आणि बियर विक्रीचे अनर्थ कारण या मार्फत समाजाच्या समोर मांडले जाणार आहे, असे देखील या मध्ये नमूद केले आहे.