तोडमल यांनी पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निर्दयी प्रकार घडला. तरीही मराठा समाजाने शांतता बाळगली. ज्यांची वकिलीची सनद जप्त झाली होती, असे समाजात तेढ निर्माण करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर गरळ ओकली. सदावर्ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भारतातील सर्वाधिक मोठी आणि शिस्तबद्ध झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुध्दा विरोध केला. सोबतच मराठा समाजाची बदनामी होईल अशी वक्तव्य प्रसार माध्यमांतून केले. एकंदरीतच मराठा समाजाविषयी विकृत मानसिकता असलेल्या सदावर्ते यांनी आपले तोंड बंद केलेले नाही. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून काहींनी त्यांच्या आलिशान गाड्या फोडल्या.
आधीच विविध संकटांमुळे पिचलेल्या मराठा तरुणांना सदावर्ते उचकावत आहेत. तर दुसरीकडे सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदावर्ते फक्त मराठा आरक्षण विषय ऐरणीवर आला की मराठा समाजाविषयी असलेला द्वेष व्यक्त करतात. ते असे का करतात की त्यांना कुणी असे करायला सांगत आहे? तरीही त्यांना अद्याप मोकळेच सोडले आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण मराठा द्वेषी सदावर्ते यांना महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी दोन महिने स्थानबद्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी सामूहिक राजीनामे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामपंचायत पदाधिकारी-सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उपसरपंच दत्तात्रय कुचेकर, सदस्य सरिता भूषण बडवे, गोपिका आदिनाथ बांदल, सोपान विठ्ठलराव शिंदे, नारायण गंगाराम खामकर, अनुराधा अंबर खामकर, सिमा भाऊसाहेब जाधव, विद्याताई हनुमंत सांगळे यांनी आपले राजीनामे सरपंच अरुणा खोमणे यांच्याकडे दिले. तर याच मागणीसाठी पाथर्डी तालुक्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची गाडी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना अडविली. आरक्षणासाठी तुम्ही काय प्रयत्न करीत आहात, असा प्रश्न विचारून राजीनाम्याची मागणी केली. निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News