मोदी यांनी शिर्डीत आल्यावर प्रथम साई समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानतर्फे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक, भव्य दर्शन रांगेचे उद्घाटन केले. त्यानंतर निळवंडे धरणावर जाऊन जलपूजन आणि कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डी विमानतळाशेजारी आयोजित सभेच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. तेथे त्यांच्या हस्ते नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. सभेत बोलताना सुरवातीला त्यांनी ह.भ.प. बाबा महाराज सातरकर यांचा विशेष उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आधी केवळ भ्रष्टाचाराचे आकडे, आता विकासकामांचा डंका
यावेळी मोदी म्हणाले, देशातील प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ हे ध्येय घेऊन आम्ही काम करीत आहोत. केंद्र आणि आताचे राज्यातील सरकार यांचे ‘गरीब कल्याण’ हेच ध्येय आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीतही वाढ करण्यात येत आहेत. २०१४ च्या आधी दहा वर्षांत जेवढे काम झाले नाही, त्याच्या सहा पट अधिक काम आम्ही या क्षेत्रात आता करून दाखविले आहे. त्यामुळे आम्ही विकास कामांचे मोठमोठे आकडे सांगू शकतो. त्या काळात असे मोठे आकडे केवळ भ्रष्टाचारासाठी सांगितले जात होते. शेतकऱ्यांच्या मतांवर अनेक जण राजकारण करतात. मात्र, त्यांना पाण्याच्या एका थेंबासाठी तरसविले जात होते. आम्ही रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी विकास साधावा, असे आवाहनही मोदी यांनी केले.
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली. मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते पूर्वी केंद्रात कृषी मंत्री होते. व्यक्तीगतरित्या मी त्यांचा सन्मान करतो. मात्र त्यांनी सात वर्षांच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केले? त्या काळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांची हमी भावाने धान्य खरेदी केली होती. आम्ही याच काळात साडे तेरा लाख कोटी रुपयांची खरेदी करून ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले आहेत. ते कृषी मंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आम्ही ही पद्धत मोडीत काढली. धान्यच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले.
सहकार चळवळीला आम्ही गती देत आहोत. देशात दोन लाख सहकारी समित्या स्थापन करण्यात येणार आहे, किसान उत्पादक संघांमार्फत शेतकरी संघटित केले जात आहेत. महाराष्ट्र हे सामर्थ्यवान राष्ट्र आहे. त्याचा विकास वेगाने झाला तर देशाचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी आपला भारत जगातील विकास देश असेल, यासाठी आम्ही काम करीत असून त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहनही मोदी यांनी केले.