• Sat. Sep 21st, 2024
दुर्गा विसर्जनात अपघात; ९ मुले जखमी, तरुण देवदूत बनले, अन् वाचवले चिमुकल्यांचे प्राण

सातारा: दुर्गा देवीजवळ बसलेले लहान मुले आगीच्या वेढ्यात सापडली. यात मुलांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने होरपळू लागल्याने एकच आरडाओरड सुरू झाली. मुले आगीत होरपळून निघत होती. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ लोकांचे मिरवणुकीतील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. मोठ्या मुलांनी ट्रॅक्टरवरून उड्या मारल्या, परंतु लहान मुलांना उड्या मारता न आल्याने ती आगीत होरपळत असल्याचे आशितोष मोहिते या युवकाने पाहिले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःला आगीत झोकून दिले.
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट; सात ते आठ लहान मुले जखमी, घटनेनं खळबळ
आगीत होरपळत असलेली मुले ट्रॅक्टरमधून बाहेर असलेल्या लोकांच्या हवाली करण्यास सुरुवात केली. आशितोष याची धडपड पाहून मदतीला कुणाल राउत आणि राहुल यादव त्याच्या मदतीला धावून आले. या आगीत तेही जखमी झाले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून होरपळणाऱ्या मुलांना बाहेर काढून उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने हलवल्याने त्यांचे महाबळेश्वर शहरात कौतुक होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत दुर्गा माता असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर जनरेटर शेजारी पेट्रोलचा कॅन होता. जनरेटरच्या इंधनाची पाईप गंजली होती. तिथेच शेजारी पेट्रोलचा कॅन होता. तो उष्णतेमुळे वितळल्याने पेट्रोल पसरून जनरेटरने पेट घेतला. त्यावर आग विझवण्यासाठी पाणी ओतल्याने पेट्रोल सर्वत्र पसरले.

या आगीत दुर्गादेवीजवळ बसलेले लहान मुले आगीच्या वेढ्यात सापडली. यात मुलांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने एकच आरडाओरड सुरू झाली. मुले या आगीत होरपळून निघत होती. जनरेटरला आग लागल्याने भडकलेल्या आगीत मिरवणुकीत सहभागी झालेली तीन ते सात वयोगटातील सात लहान मुले व दोन तरुण अशी एकूण नऊ जण आगीत होरपळून जखमी झाली. आगीत जखमी झालेल्या मुलांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यामध्ये तीन मुलांची स्थिती गंभीर आहे. त्यांना रात्रीच पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडपासून नांदेडपर्यंत आवाज बुलंद, ४० वर्ष भाजपशी एकनिष्ठ, एकनाथ पवार ठाकरेंसाठी पॉवरफुल ठरणार?

यामध्ये अलिना सादिक नदाफ (६), समर्थ सनी सपकाळ (७), शिवांश संजय ओंबळे (४), ओवी पवन पॉल (साडेचार), आराध्या प्रशांत भोसले (४), संस्कृती सुनिल वाडकर (४), साईशा अमित पवार ४) तसेच मुलांना वाचविताना आशितोष यशवंत मोहीते (वय 19), कुणाल किशोर राउत (वय २४, रा. सर्वच रा. कोळी आळी, महाबळेश्वर) ही सर्व जखमी झाली आहेत.

शहरात सायंकाळपासून विविध मंडळाच्या मूर्ती विसजर्नासाठी बाजारपेठेत रांग लावून विसर्जन विहिरीकडे मार्गक्रमण करत होत्या. सायंकाळी साडेसात वाजता डीजेच्या दणदणाटात कोळी आळी येथील दुर्गामाता उत्सव समितीची दुर्गा मूर्तीची मिरवणूक सुरू झाली. मंडळाचे कार्यकर्ते डीजे समोर नाचत होते. डीजेच्या भिंत्तीमागे एका लहानशा ट्रॅक्टरवर दुर्गामातेची मूर्ती होती. या मूर्तीजवळ आशितोष मोहिते होता. तर मूर्तीच्या पायाजवळ साधारण १३ ते १६ लहान मुले बसली होती. याच ट्रॉलीवर जुना जनरेटर सुरू होता, तर त्या जनरेटर शेजारी एक ४ लिटरचा पेट्रोलचा कॅन होता.

जनरेटरची इंधनाची पाईप गंजली होती. तिथेच शेजारी पेट्रोलचा कॅन होता. तो तेथील उष्णतेमुळे वितळला. त्यामुळे पेट्रोल पसरून जनरेटरने पेट घेतला. त्यावर काही जणांनी पाणी ओतल्याने पेट्रोल सर्वत्र पसरले. या आगीत सर्व लहान मुले वेढली गेली. मुलांच्या अंगावरील सर्व कपड्यांनी पेट घेतला. मुले होरपळू लागल्याने एकच कल्लोळ सुरू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली. साधारण नऊ दहा वर्षांच्या मुलांनी ट्रॅक्टरवरून उड्या मारल्या, परंतु लहान मुलांना उड्या मारून बाहेर पडता आले नाही. मुले आगीत होरपळत असल्याचे आशितोष मोहिते याने पाहिले व क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःला आगीत झोकून दिले. आगीत पेटत असलेली मुले त्याने ट्रॅक्टरमधून बाहेर असलेल्या लोकांच्या हवाली करण्यास सुरुवात केली. आशितोष याच्या मदतीला कुणाल राउत व राहुल यादव हे धावून आले. त्यांनी या मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; सततची भांडणं, पतीचा टोकाचा निर्णय, अन् कुटुंब उद्धवस्त, काय घडलं?
अनेक गोंधळ सुरू होताच डीजेच्या समोर असलेली मुले मदतीसाठी धावून आली. काहींनी रुग्णवाहिका सांगितल्या, तर काहींनी आपली वाहने सज्ज केली. परंतु, एका बाजूला डिजेची भिंत्त तर दुसरीकडे रस्त्यावर मंडळाचा मंडप होता. त्यामुळे घटना स्थळापर्यंत वाहन पोहोचू शकले नाही. अनेक तरुणांनी मुलांना हातावर घेऊन धावतच वाहनात बसविले व सर्व मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी मुलांचा व त्यांच्या नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू होता. रुग्णालयाचा परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संदीप भागवत हे आपल्या कर्मचारी यांच्यासह तातडीने रुग्णालयात पोहोचले.

माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगरसेवक संतोष शिंदे, हेमंत साळवी, प्रेषित गांधी, संतोष पवार, रविंद्र केंडे, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, रविंद्र कुंभारदरे, कुमार शिंदे तसेच कोळी आळी येथील मंडळाचे असंख्य पदाधिकारी या वेळी ग्रामीण रुग्णालयातील बचाव कार्यात सहभागी झाले होते. ग्रामीण रुग्णालयात सर्व मुलांवर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. परंतु रुग्णांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी तातडीची सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आपली मुले पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविली. सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात सर्व जखमींना दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम हेदेखिल सातारा येथील रूग्णालयात पोहोचले. त्यापाठोपाठ सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे देखिल रग्णालयात पोहोचले. त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली व आवश्यक ती सर्व मदत करण्यास सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या पाठोपाठ आमदार मकरंद पाटील हेदेखील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी देखील सर्व रुग्णांची भेट घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली. जखमी मुलांचे नातेवाईक बचाव कार्य करणारे कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी हे रुग्णालयात पोहोचल्याने सातारा येथेही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

दसरा मेळाव्यातील भाषणांपेक्षा सभेला गर्दी ओसरल्याच्या चर्चा, कारणे काय?

महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील रुग्णालयात धाव घेत रुग्णांची भेट घेऊन नातेवाईकांशी संवाद साधला. या आगीत जास्त जखमी झालेले समर्थ सपकाळ, अलिना नदाफ आणि शिवांश ओंबळे यांना अधिक उपचारासाठी पुणे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. कोळी आळी येथे दुर्घटना घडली. तेव्हा बाजारपेठेत डीजेचा दणदणाट ढोल-ताशांचा गजर तर, महिलांचा दांडीया सुरू होता. कोणालाच याबाबतचे सोयरसुतक नव्हते.

कोणालाच काही वाटत नव्हते. कोणत्याही मंडळाने आगीत जखमी झालेल्या मुलांची ही घटना गांभिर्याने न घेता आपला उत्साह सुरूच ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत ही दुर्गामाता विसर्जन मिरवणूक सुरू होती. मंडळाच्या पदाधिकारी यांनी दाखविलेल्या या असंवेदनशीलतेबाबत शहरातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. डिजेच्या दणदणाटाबाबतही प्रशासनाच्या कोरड्या भूमिकेवरही शहरातून जोरदार टीका केली जात आहे. प्रशासनाने डीजेच्या आवाजाबाबत दाखविलेल्या अनास्थेची चर्चादेखील शहरात सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed