मुंबई, दि. 25 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊ नका, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी प्रशासनाला दिले.
‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना पाहिजे असलेल्या दाखल्यांचे वितरण तातडीने केले जात आहे. विविध दाखले नियोजित वेळेत मिळत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
आज आयोजित ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, मिळकत प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांचे संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांमधून लाभ मिळावा यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/